मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी म्हणून ओळखली जावी असे माझे स्वप्न आहे : प्रवीण दादा गायकवाड काय म्हणाले
सर्वांना सस्नेह जय जिजाऊ !
मराठा ही खूप व्यापक आणि सर्वसमावेशक अशी ओळख आहे. महाराष्ट्राबाहेर, देशाबाहेर महाराष्ट्रातील सर्व लोकांना मराठा म्हणून ओळखले जाते. भविष्यात ही मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी म्हणून ओळखली जावी असे माझे स्वप्न आहे. त्यासाठीच “अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला” ही संकल्पना घेऊन संभाजी ब्रिगेडची भविष्यातील वाटचाल व्हावी अशी माझी अपेक्षा आहे.
याआधीच्या काळात संभाजी ब्रिगेडने इतिहास, आरक्षण, इत्यादि विषयात आक्रमकपणे भूमिका घेतल्या. हजारो कार्यकर्त्यांवर केसेस झाल्या. त्यातून काही बाहेर आले, तर काहीजण अजूनही कायदेशीर लढा देत आहेत. अनेक सहकारी आज आपल्यात नाहीत. अनेकांनी वेगळे मार्ग निवडले. या सगळ्यांच्या योगदानातून संभाजी ब्रिगेड नावारुपाला आली.
इथून पुढचा काळ हा प्रचंड संघर्षाचा आहे. जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येकाने आर्थिकदृष्ट्या सक्षम बनणे ही काळाची गरज बनली आहे. काळाची पावले ओळखून आपण मार्गक्रमण करायला हवे. त्यादृष्टीनेच आज ही बिझनेस कॉन्फरन्स आयोजित केली होती.
या बिझनेस कॉन्फरन्ससाठी बारामती ऍग्रोचे सीईओ आमदार रोहितदादा पवार उद्घाटक म्हणून लाभले. युकेज रिसॉर्ट प्रा.लि. चे संतोष पाटील यांनी शाश्वत उद्योगाची पायाभरणी या विषयावर मार्गदर्शन केले. चिंतामणी मोटर्स प्रा.लि. चे उज्वल साठे यांनी Business & Business ही संकल्पना आपल्याला पटवून सांगितली. युवा उद्योजक अजयसिंह सावंत यांनी दुबई बिझनेस टूर आणि उद्योगभारतीचे संचालक महेश कडूस पाटील यांनी इस्राईल ऍग्रीकल्चरल टूर हे विषय घेऊन परदेशातील नोकरी, व्यवसाय व तंत्रज्ञान यातील संधींची ओळख करुन दिली. इम्पोर्ट एक्स्पोर्ट फेडरेशनचे संस्थापक अभिजित शिंदे यांनी आयात निर्यात याबाबतच्या आपल्या मनातील अनेक शंकांचे निरसन केले. निवृत्त शासकीय अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी नॉलेज-स्किल-ऍटीट्युड या विषयाच्या अनुषंगाने प्रेरणादायी असे मार्गदर्शन केले. अभिनेते भरत जाधव, नागराज मंजुळे, अशोक समर्थ, निखिल चव्हाण यांनी सिने-कला क्षेत्रातील विविध संधी याबाबत सर्वांगीण बाबींची चर्चा केली.
एकंदर व्यवसाय विषयासंबंधी आपल्या मनात असणारी भीती, न्यूनगंड, अज्ञान आजच्या बिझनेस कॉन्फरन्सनंतर काही अंशी का होईना दूर होऊन आपण व्यवसाय क्षेत्रात उतराल अशी अपेक्षा आहे.
संभाजी ब्रिगेडची नवी दिशा आणि नवा विचार हा आर्थिक सक्षमीकरणावर भर देणारा राहील अशी मला खात्री आहे.
मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेड आयोजित “नवी दिशा नवा विचार” या बिझनेस कॉन्फरन्ससाठी महाराष्ट्रभरातून उपस्थित राहिलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आजचा कार्यक्रम कसा वाटला याविषयी आपापल्या प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त कराव्यात असे मी सर्वांना आवाहन करतो. सर्वांनी सुरक्षित प्रवास करा आणि सुखरुप घरी पोहोचल्यानंतर मेसेजद्वारे कळवा.
आपण असेच भेटत राहू. नव्या दिशेने नव्या विचाराने समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध राहू.
- प्रवीण गायकवाड
प्रदेशाध्यक्ष, मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र.