“अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख” ही संकल्पना नक्की काय आहे ?
– प्रवीण गायकवाड, प्रदेशाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी त्यांनी एक संकल्पना मांडली होती, ती म्हणजे “अहद तंजावर तहद पेशावर, अवघा मुलुख आपला !”
आपण जर जगाचा नकाशा काढून बघितला, तर तंजावर हे ठिकाण भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील तामिळनाडू राज्याच्या टोकाला आणि पेशावर हे ठिकाण पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेजवळ असल्याचे आपल्याला दिसून येईल.
थोडक्यात तंजावरपासून पेशावर पर्यंतचा मुलुख आपला असावा असे महाराजांना का वाटत होते ? तर त्यामागे महाराजांची फार मोठी दूरदृष्टी होती. त्यातून त्यांना रयतेला एक दिशा आणि प्रेरणा द्यायची होती. आपल्या लोकांनी केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता तंजावरपासून पेशावरपर्यंत मुलुखगिरी करुन आपले वर्चस्व निर्माण केले पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते. नंतरच्या काळात मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावून महाराजांचे स्वप्न पूर्ण केले.
आज आपण सर्वजण महाराजांना आपले आदर्श मानतो. त्यांनी आपल्याला जो मार्ग दाखवला, जी दिशा आणि प्रेरणा दिली, तीच आपल्याला प्रगतीकडे घेऊन जाऊ शकते असा आपल्या सर्वांना विश्वास आहे.
जागतिकीकरणामुळे आता जग ग्लोबल झाले आहे. जगात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर उद्योग, व्यवसाय आणि नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. लॉकडाऊननंतर तर जगातल्या विविध संधी हेरण्याची आणि त्यातून आपले अर्थकारण मजबूत करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.
आजच्या काळात महाराजांची प्रेरणा आणि जगात उपलब्ध झालेल्या विविध संधी यांची सांगड घालण्याची आवश्यकता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने एक “नवी दिशा, नवा विचार” समाजासमोर मांडला आहे, तो म्हणजे “अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला !”
आपल्या सर्वात पूर्वेला ऑस्ट्रेलिया आणि सर्वात पश्चिमेला कॅनडा असे हे दोन देश आहेत. या दोन्ही देशांच्या दरम्यान सहा खंडात (ऑस्ट्रेलिया, आशिया, युरोप, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका) यामध्ये संपूर्ण जग पसरले आहे. भारताच्या तुलनेत बाहेर जगात लोकसंख्येचे प्रमाण कमी आहे, त्यामानाने संधी प्रचंड आहेत. भारतातील पंजाबी, सिंधी, केरळी, तमिळ, गुजराती, मारवाडी, इत्यादि लोकांची उदाहरणे आपल्यासमोर आहेत. या लोकांनी जगातल्या संधी हेरल्या आणि तिथे जाऊन आपले अर्थकारण मजबूत केले.
आता आपल्या लोकांनीही ऑस्ट्रेलियापासून कॅनडापर्यंत पसरलेल्या या प्रदेशात मुलूखगिरी करावी, तिथं जाऊन नोकरी, उद्योग आणि व्यवसायाच्या संधी हेराव्यात, त्यातून आपले अर्थकारण मजबूत करावं आणि जगभर आपली कम्युनिटी फार्मिंग (लोकवस्ती) करावी अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे. त्यासाठीच “अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला ! ही संकल्पना रुजवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज हा विचार पेरला तर निदान भविष्यात तरी आमची लोकं समृद्ध व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील हा आमचा विश्वास आहे.
- प्रवीण गायकवाड
प्रदेशाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र.