मुख्य बातम्या

परळीत पुढील 10 निवडणुकांमध्ये धनंजय मुंडेंना कोणीही रोखू शकणार नाही : जयंत पाटील

परळीत पुढील 10 निवडणुकांमध्ये धनंजय मुंडेंना कोणीही रोखू शकणार नाही : जयंत पाटील

परळी :महाविकास सरकार आले तेव्हा कोरोना आला आणि शासनाला कोरोनाविरोधात सर्व ताकद खर्च करावी लागली. आता मराठवाड्यात प्रचंड पाऊस पडत आहे. शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. पालकमंत्री मा. धनंजय मुंडे यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शासन नुकसानभरपाई देण्याची सगळी व्यवस्था करेल, अशा आश्वासक शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांनी मराठवाड्यातील जनतेला धीर दिला. ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा – संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूशी!’ या संवाद दौऱ्याच्या तिसऱ्या पर्वातील चौथ्या दिवशी आज ते परळी विधानसभा मतदारसंघातील आढावा बैठकीत बोलत होते.

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, “आगामी काळात इस्लामपूर, बारामतीमध्ये जी प्रगती झाली, ती प्रगती परळीतही आपल्याला काही वर्षांत दिसेल. परळी लवकरच पहिल्या १०० मतदारसंघात येईल. तुम्ही तुमचा नेता तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपला तर तुमची परळी नंबर एक बनेल. यापूर्वी असे प्रेम स्व. गोपीनाथ मुंडे यांना मिळाले होते. दुर्दैवाने त्यांचे आकस्मिक निधन झाले. पण तुम्ही पुन्हा एकदा तुमचा नेता निवडला आहे. या नेतृत्वाचे हात तुम्ही अधिक बळकट करायला हवे. माणूस मोठा होत असेल, पुढे जात असेल, आव्हान देत असेल तर त्याला मागे खेचण्याचे काम केले जाते. म्हणून परळीकरांनी या भूलथापांना बळी पडू नये. धनंजय मुंडे यांच्यात राजकारणाचा समंजसपणा आहे. परळीकरांच्या आशीर्वादाने काळाच्या पुढचा विचार करणारे नेतृत्व आपल्याला मिळाले आहे. या नेत्याला अधिकाअधिक ताकद द्या आणि परळीचे नाव देशात न्या.”

तसेच भाजपवर टीका करताना मा. जयंत पाटील म्हणाले की, “शेतकऱ्यांना थोडा फायदा मिळू लागला तर भाजपच्या पोटात दुखू लागतं. महागाईचं नाव घेऊन सामान्य लोकांना वेठीस धरले जात आहे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढले तेव्हा महागाई वाढत नाही का? दिल्लीत सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट जोरात सुरु आहे. यामध्ये पंतप्रधानांचे मोठे घर बनवले जात आहे. कशाला हवंय नवं घर? हे लोकांना आपण सांगितले पाहिजे.”

याच बैठकीत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. धनंजय मुंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. “२०१२ ला ज्यावेळी माझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत झाला त्यावेळी रस्त्याहून जाणारे लोक नीट बोलत नव्हते. या मातीतल्या माणसांनी मला धन्याचा धनुभाऊ केलं. २०१२ झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत माझा दारुण पराभव झाला. आज परळी पंचायत समिती, परळी मार्केट कमिटी आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत.”

पराभूत झालेल्या उमेदवारांला आदरणीय पवार साहेबांनी विधान परिषदेवर नेलं, राज्याच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी दिली. अनेक पराभव पाहिले, अनेक पडतीचे काळ पाहिले पण खचलो नाही ते याच मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे, अशा शब्दांत मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी मराठवाडा संपर्क प्रमुख जयसिंगराव गायकवाड, बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनावणे, आमदार संजय दौंड, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिवकन्याताई शिरसाट, बीड निरीक्षक जीवनराव गोरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, मा. उषाताई दराडे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, मा. हेमाताई पिंपळे, मतदारसंघ अध्यक्ष गोविंदराव देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष सौ. संगिता तुपसागर, युवक जिल्हाध्यक्ष जयसिंग सोळंके, चायत समिती सभापती बालाजी मुंडे, मार्केट कमिटीचे सभापती ऍड. गोविंदराव फड, शिवाजी सिरसाट, वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव, प्रज्ञाताई खोसरे, रेखाताई फड आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Most Popular

To Top