ठाणेकर आरती बेळगली यांचा ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरात झेंडा.. भारतीय दूतावासात नियुक्ती.
मुंबई : खाकी वर्दीतील पोलीस नाईक पदावरून थेट ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरात हिंदुस्थानी दूतावासात ठाणेकर आरती बेळगली यांची नियुक्ती झाली. त्यांच्या या नियुक्तीने सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र इतक्या मोठ्या पदावर मजल मारण्यासाठी आरती यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांची चिकाटी ही वाखाण्याजोगी आहे. त्यांच्या या यशामुळे ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यात आला आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयात पोलीस नाईक असलेल्या आरती बेळगली यांची नुकतीच परराष्ट्र मंत्रालयातंर्गत हिंदुस्थानी दूतावासात सहाय्यक सुरक्षा अधिकारी म्हणून निवड झाली. ठाण्यात विशेष शाखेत काम करणाऱ्या आरती बेळगली पुर्वाश्रमीच्या माया पाटील असून त्यांनी बाळकूम येथील मराठी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण पूर्ण केले. मात्र दूतावासातील नोकरीचे स्वप्न त्यांना खुणावत होते. त्यामुळे फर्डे इंग्रजी बोलणे, उत्तम वक्तृत्व, अति महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा सांभाळणे अशा बाबींचा त्यांनी विशेष शाखेत कर्तव्य बजावताना अभ्यास केला. २०१९ मध्ये दूतावासात निवड होण्यासाठी झालेल्या परीक्षेत उत्तम गुणांनी आरती यांनी प्राविण्य मिळवले. त्यातून त्यांची ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरात नियुक्ती झाली असून दिल्लीतील महिन्याभराच्या प्रशिक्षणानंतर आरती ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहेत.
कौटुंबिक आघाडीही सांभाळली.
ठाण्याच्या बाळकूम येथे पती, मुलगी आणि सासू यांच्यासोबत राहणाऱ्या आरती यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत दूतावासाच्या नियुक्तीकरिता आवश्यक असणाऱ्या परीक्षेची तयारी केली. ठाण्यातून याआधी एका पोलीस कर्मचाऱ्याची या पदासाठी नियुक्ती झाली होती. त्यानंतर या पदी रुजू होणाऱ्या आरती या पहिल्या महिला पोलीस कर्मचारी ठरल्या आहेत.