मुख्य बातम्या

भाजपने ती परवानगी देण्यास त्यादिवशी विरोध केला नसता तर आज महाराष्ट्रातील सत्तेचे चित्र कदाचित वेगळं असते ; ऐतिहासिक सभा द्वितीय वर्षपूर्ती !

भाजपने ती परवानगी देण्यास त्यादिवशी विरोध केला नसता तर आज महाराष्ट्रातील सत्तेचे चित्र कदाचित वेगळं असते ; ऐतिहासिक सभा द्वितीय वर्षपूर्ती !

२०१४ च्या निकालानंतर २०१९ च्या निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक चढ उतार पाहिले. एक एक करत वर्षानुवर्षे साथ देणारे शिलेदार संकट काळात सोडून गेले. अगदी पत्त्याचा बंगला कोसळावा तसाच पक्ष कोसळून पडला होता. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातील सह्याद्री म्हणवले जाणारे शरद पवार अजून हिंमत हरले नव्हते. ४ खासदार असल्यामुळे नॅनो पक्ष म्हणून हिनवला जाणारा पक्ष साताऱ्यातील उदयनराजे यांच्या ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलेल्या राजीनाम्यामुळे अजून दुबळा झाल्याची भावना निर्माण झाली होती.

त्यानंतर काही दिवसांतच महाराष्ट्रातील विधानसभा व उदयनराजेंनी राजीनामा दिल्यामुळे सातारा लोकसभा यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन प्रचाराची धामधूम सुरू झाली. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा जिल्हा आणि या जिल्ह्यात होणारी ही पडझड राष्ट्रवादी काँग्रेसला परवडणारी नव्हती. त्यामुळे पवार साहेबांचे या मतदारसंघावर विशेष लक्ष होते.

भाजपनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, अगदी केंद्रीय नेतृत्वापर्यंत सर्वांनीच ही जागा निवडून आणण्यासाठी चंग बांधला होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही उमेदवाराची चाचपणी पूर्ण झाली होती. दोन वेळा कराड मतदारसंघातून खासदार राहिलेले पवार साहेबांचे वर्गमित्र, माजी सनदी अधिकारी व सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील हे आपल्या मित्राच्या म्हणजे पवार साहेबांच्या आग्रहाखातर ही लढाई लढायला तयार झाले होते तर भाजपकडून पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले उभे होते.

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात कसल्याही परिस्थितीत पवारांना धोबीपछाड द्यायचीच या हट्टाला पेटलेल्या भाजपचा देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांची सभा साताऱ्यात आयोजित करण्याचा मानस होता. त्यामुळे खुद्द पंतप्रधान प्रचारासाठी आले तर साहजिकच निवडणुकीत वातावरण बदलाची भीती मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना होती व तसे त्यांनी पवार साहेबांजवळ बोलूनही दाखवले होते.

अशातच १७ ऑक्टोबर २०१९ रोजी नरेंद्र मोदींची साताऱ्यात सभा होणार असल्याचे भाजपकडून निश्चित झाले. त्यानंतर नरेंद्र मोदींची सभा झाल्यावर त्याच संध्याकाळी आपली सभा आयोजित करा व बाकी सगळे माझ्यावर सोडा असे आदेश पवार साहेबांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना दिले. आणि त्याप्रमाणे पदाधिकाऱ्यांनी त्याच दिवशीची म्हणजे १७ ऑक्टोबर २०१९ च्या सभेसाठी प्रशासनाकडे परवानगी मागितली.

वास्तविक नरेंद्र मोदींची सभा झाल्यावर त्यांच्या सभेचा करिश्मा जास्त काळ टिकू द्यायचा नाही व आपण सभा घेऊन लगेच वातावरण फिरवायचे हा पवार साहेबांचा उद्देश होता. त्यामुळे त्याच दिवशीची सभेची परवानगी त्यांनी पदाधिकाऱ्यांना घ्यायला लावली होती मात्र प्रशासनाकडून ती परवानगी नाकारण्यात आली. त्याच दिवशीची परवानगी मागितल्यामुळे यामागे काहीतरी शिजतंय हे भाजपला कदाचित समजले असावे व जाणीवपूर्वक त्यांनीच त्या दिवशीची परवानगी मिळू दिली नसावी.

१७ ऑक्टोबर २०१९ च्या सभेची राष्ट्रवादीला परवानगी नाकारल्यामुळे दुसऱ्या दिवशीची म्हणजे १८ ऑक्टोबरच्या संध्याकाळची परवानगी सभेसाठी घेण्यात आली. दिवसभर आपल्या इतरत्र असलेल्या प्रचारसभा आटोपून सायंकाळी पवार साहेब सभास्थळी दाखल झाले. गाडी मैदानात येण्याच्या साधारण पाच मिनिटं आधीच पाऊस थांबला होता. पवारसाहेब गाडीतून उतरून व्यासपीठावर गेले व रामराजे निंबाळकरांचं चालू असलेलं भाषण थांबवून आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि त्यानंतर पुन्हा जोराचा पाऊस सुरू झाला. मात्र न थांबता तसेच पावसात उभे राहत साहेबांनी आपले भाषण पूर्ण केले.

पावसातील त्या सभेनंतर एक भावनिक वातावरण तयार झाले, सबंध महाराष्ट्रात त्या सभेचे छायाचित्रण व्हायरल झाले. लहानांपासून थोरांपर्यंत अनेकांच्या स्टेट्सला, पोस्टला त्या दिवशी फक्त पवार साहेबच दिसत होते. अशा प्रकारे मोदींचा करिश्मा टिकू न देता वातावरण फिरवण्यात पवार साहेब यशस्वी झाले होते. १७ ऑक्टोबरला जर प्रशासनाने सभेची नाकारली नसती तर हा पावसातील सह्याद्री महाराष्ट्राला अनुभवता आला नसता, खरंतर याबद्दल भाजपचे धन्यवाद मानलेच पाहिजेत. आणि विशेष आभार मानावेत ते आदरणीय श्रीनिवास पाटील साहेबांचे ज्यांनी “जिंदगी में कभी मौका मिले तो सारथी बनना” म्हणत मैत्रीची व्याख्या पूर्ण केली !

  • प्रशांत धुमाळ : श्रीगोंदा

Most Popular

To Top