दिल्ली झुकली, तुम्ही एवढे ताठर का?
-विलास बडे
सरकार, एसटी महाराष्ट्राची रक्तवाहिनी आहे. गावखेड्यातल्या, वाड्या वस्तीवरच्या, तांड्यांवरच्या माणसांचा सहारा आहे. या महाराष्ट्राच्या कित्येक पिढ्या या लालपरीच्या अंगाखांद्यावर मोठ्या झाल्या. तिच्या पायांवरच आमच्या पिढ्या शिक्षणाच्या दारात पोहोचल्या. आजही गावखेड्यातल्या म्हाताऱ्या कोताऱ्यांची ती काठी आहे. गरीबांची परी आहे. तिचे कितीतरी ऋण आहेत आपल्या महाराष्ट्रावर. पण आज ती ऐतिहासिक संपामुळे ठप्प आहे. कारण तिचा सेवेकरी हतबल झालाय. घायकुतीला आलाय. गुडघ्यावर आलेला कर्मचारी आत्महत्येच्या दारात उभा आहे. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.
सरकार, लालपरी तोट्यात आहे ती सेवेकऱ्यानं कर्तव्यात कसूर केला म्हणून नाही. काहीजणांनी तिला ओरबाडलं म्हणून. ती तोट्यातून बाहेर कशी येईल याचा सल्ला घेण्यासाठी तुम्ही शेकडो कोटी खर्च करता पण एका साध्या 10 पास कर्मचाऱ्याला विचारा तो सांगेल तुम्हाला एसटी तोट्यात का गेली?
आज काही प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून हवी आहेत. जर एसटी ना नफा, ना तोटा या तत्वावर सामान्यांना सेवा देण्यासाठी चालवली जात असेल तर सरकार एसटीकडून भरमसाठ करवसुली का करतंय? मतांच्या बेगमीसाठी एसटीच्या कारभारात सतत हस्तक्षेप का करतंय? जिथं नेत्यांचे चिल्लेपिल्ले टोल न भरता गाड्या नेतात. आमदार खासदारांना टोलवर थांबवलं जात नाही तिथं महाराष्ट्र शासनाच्या एसटीवर वर्षाला हजारो कोटींची टोल वसुली कशासाठी? एसटीच्या प्रत्येक गोष्टीत होणारा भ्रष्टाचार कोण थांबवणार?
सरकार, तुम्ही एसटीच्या जीवावर सामान्यांना सवलती देता, गुडविल कमावतं त्यातून मतं मिळवता. त्यासाठीचा पैसा मात्र कर्मचाऱ्यांच्या वेठबिगारीतून भरून काढणार? कर्मचाऱ्यांच्या हक्काचे करार वेळेवर का होत नाहीत? का त्याला सतत संप करावा लागतो? सरकारची धोरणं चुकली म्हणून कर्मचाऱ्याच्या चुलीत पाणी पडलं, त्याची कधी विचार होणार आहे?
सरकार, अत्यंत कष्टाचं काम करणारी एसटीतील पोरं कुण्या कलेक्टर, आमदार, खासदाराची नाहीत. सामान्य शेतकऱ्याची आहेत. त्यातल्या त्यात दुष्काळी पट्ट्यातली. यांच्या बापाच्या शेतीने दगा दिला म्हणून चाकरीसाठी सरकारच्या दारात आली. ही पोरं नैसर्गिक न्याय मागताहेत. गाड्या, घोड्या, बंगले नाही फक्त जगण्याची तरतूद मागताहेत.
तुम्ही कधी विचार केलाय तो आत्महत्या का करतोय? कारण त्याच्यावर कामाचा प्रचंड ताण आहे. चाकावरचं खडतर आयुष्य आहे. कित्येकांचे मणके गेले. पण त्या कष्टाचा मोबदलाही मिळत नाही. दोनदोन दिवस तो घरी जात नाही. गेला तर घरातली परिस्थिती बघवत नाही. आपण गंडवलो गेलोय. आपलं कुणीच नाही या भावनेतून नैराष्यात गर्तेत सापडलाय. आज त्याला कष्टाचा मोबदला द्या. विश्वास द्या. तो लढवय्या आहे मरणार नाही.
सततची फसवणूक नको म्हणून एसटी कर्मचारी कित्येक वर्षं विलिनीकरण करा म्हणतोय. सरकार नकारघंटा वाजवतंय. हे आता शक्य नाही म्हणतंय. पण यांना ते स्वप्न तुम्हीच दाखवलं. त्या आश्वासनावर यांची एकगट्ठा मतं मिळवली. आज छाताडावर हात ठेवून सांगा महाराष्ट्राला, तुमचा जाहीरनामा खोटा होता. तुमच्यासमोर ठोकलेली आश्वासनं हा निव्वळ जुमला होता.
सरकार तुम्ही खासगीकरणाच्या पर्यायाची चाचपणी करताय. जरूर करा. तुम्ही ती आधीच केलीय. पण धंदेवाईक लोकांना तुमच्या नफा कमवून देणाऱ्या मार्गात रस असेल. मोक्याच्या जागांमध्ये रस असेल यात शंका नाही. पण माझ्या वाड्या वस्ती तांड्यावर ते येणार आहेत का? गरीबांना सवलती देणार आहेत का? नाही. म्हणून खासगीकरण हे कर्मचाऱ्यांच्या नाही सामान्यांच्या मुळावर उठणारं असेल.
विलिनीकरणाची प्रक्रिया एका दिवसात होणार नाही. पण वेतनाची अर्थसंकल्पात तरतूद करून त्यांना जगण्याइतका पगार देण्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला कुठलंच कोर्ट रोखू शकत नाही. दिल्लीतल्या शक्तीशाली सत्तेला जनरेट्यापुढे झुकावं लागलं हे लोकशाहीचं सौंदर्य आणि सामर्थ्य आहे. तुम्हीही संवेदनशील बना. निर्णय घ्या. पुसलेल्या कुंकवाचा डाग तुमच्या खुर्चीला लागण्याआधी.