मी पत्रकार

माणसाच्या जीवनामध्ये विचारांचे स्थान!

आरोग्य मनाचे

माणसाच्या जीवनामध्ये विचारांना फार महत्वाचे स्थान आहे. विचार करण्याची शक्ती निसर्गाने फक्त माणसाला मुक्त हस्ताने बहाल केली आहे. माणसा खेरीज अन्य कोणत्याही प्राण्याकडे विचार करण्याची अथवा विचारांची देवाण-घेवाण करण्याची ही शक्ती नाही. माणसाच्या जीवनावर त्याच्या विचारशक्तीचा कसा प्रभाव पडत असतो हे पहाणे मनोरंजक ठरेल . या विचारांचे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन संपूर्ण वेगळे प्रकार असतात. सकारात्मक विचार हे एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करत असतात आणि या सकारात्मक विचारांमुळेच तर आपल्यात उत्साह निर्माण होतो . या उत्साहाच्या बळावरच आपण एखादे अशक्य वाटणारे कार्य सुध्दा लीलया पूर्ण करू शकतो.

माणसाच्या जीवनात जो पर्यंत उत्साह उत्तम प्रकारे टिकून आहे, जिवंत आहे तो पर्यंत माणसाला कोणत्याच गोष्टीची भीती वाटत नाही, तो त्या उत्साहाच्या जोरावर जीवनात खूप मोठी कामगिरी पार पाडू करतो. मानसशास्त्रानुसार माणूस दिवसभरात अंदाजे सत्तर हजार इतके विचार करतो. या विचारांपैकी काही विचार हे तो जाणिवपूर्वक करतो , त्याला आपण जागृत मन असे म्हणतो , तर काही विचार मनुष्याच्या विचारसरणीनुसार, त्याच्यावर झालेल्या संस्कारानुसार मनात स्फुरत असतात, तसेच काही विचार हे त्याच्यावर लहानपणापासून झालेले संस्कार, संगत आणि शिक्षण यानुसार त्याच्या मनात निर्माण होत असतात, हे आपले सुप्त मन असत, आणि आपले सुप्त मन हे ९५% काम करता तर जागृत मन फक्त ५% काम करत असत.

आपण जसे विचार करतो त्यानुसार त्याचा चांगला अथवा वाईट परिणाम हा त्याच्या जीवनावर होतच असतो.जर तुम्ही चांगले विचार केलेत तर जीवनात चांगले घडते आणि चुकीचे विचार केले तर त्याप्रमाणेच जीवन घडत जाते.म्हणजेच माणूस काही काम न करता अगदी रिकामा जरी बसला असेल तरीही त्यावेळी त्याच्या मनात विचार सुरूच असतात. अगदी सकाळी जाग आल्यापासून रात्री गाढ झोपेपर्यंत माणूस विचारच करत असतो. एखादे काम करत असतानादेखील मनाच्या एका कोपऱ्यात विचारांची साखळी खोलवर कुठेतरी सतत चालू असते. जर माणूस सतत विचारच करत असेल तर तो नेहमी आपल्या विचारांच्या संगतीमध्ये जगत असतो असे म्हणावे लागेल. जर विचारांप्रमाणे माणसाच्या जीवन घडत असेल तर माणसाने विचार करताना सतत सावध राहणे देखील फार गरजेचे आणि महत्वाचे आहे. वाईट, नकारात्मक विचार जीवनाला चुकीची कलाटणी देतात, तणाव वाढवतात , तर सकारात्मक विचार माणसाला जीवनात यशाच्या शिखरावर नेतात. मात्र विचारांबाबत सावध नसल्यामुळे आजकाल सगळीकडेच नकारात्मक विचारसरणी दिसून येते.

मन आणि विचारांचे सामर्थ्य माहीत नसल्यामुळे अनेक माणसे कळत अथवा नकळत सतत नकारात्मक विचार करत असतात. काही जणांना नकारात्मक विचार करण्याची ऐवढी सवय असते की प्रत्येक गोष्टीबाबत त्यांच्या मनात नकारात्मक विचारच अगोदर येतो. शिवाय आपण कळत आणि नकळत सतत नकारात्मक विचार करत आहोत याची पुसटची जाणिवदेखील या लोकांना नसते. मात्र निसर्ग आपले काम अगदी प्रामाणिकपणे करीत असतो. जे विचार आपले मन करत तसेच परिणाम आपल्याला दिसतात. चांगला विचार केला तर आनंद आणि समाधान मिळत तर नकारात्मक विचार केला तर चुकीच्या विचारांचे परिणाम माणसाला निसर्गनियमानुसार भोगावेच लागतात. यासाठी प्रत्येक माणसाला सकारात्मक विचार आणि मनाचे सामर्थ्य माहीत असायलाच हवे. सतत प्रयत्नपूर्वक पॉझिटिव विचार करून तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच यश मिळवू शकता. मात्र त्यासाठी नेहमी पॉझिटिव्ह थिंकीक अथवा सकारात्मक विचार कसे करायचे हे तुम्हाला माहीत असायला हवे.

मनाचा आणि शरीराचा एकमेकांशी घट्ट संबध असतो. मन दुःखी असल्यास त्याचा परिणाम शरीरावर होतोच . नैराश्य ,उदासीन माणसांना कोणतेही कारण नसताना पाठदुखी, दातदुखी, पोटदुखी अथवा डोकेदुखीचा त्रास जाणवतो. या दुखण्यावर डॉक्टरांकडे तपासणी केल्यावर कोणतेही शारीरिक कारण सापडत नाही. रिपोर्ट नॉर्मल असूनसुद्धा अशा लोकांना तीव्र डोकेदुखी, पाठदुखी अथवा पोटदुखीचा त्रास जाणवल्याची अनेक उदाहरणे आहेत. जेव्हा तुमचे मन प्रसन्न असते तेव्हा त्याचे सुपरिणाम तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दिसून येतात अगदी त्याचप्रमाणे मनातील दुःखद भावनांचे दुष्परिणामदेखील तुमच्या शरीरावर दिसून येतात. म्हणूनच निरोगी राहण्यासाठी सतत सकारात्मक विचार करणे फार गरजेचे आहे.

जर एखाद्याला सतत नकारात्मक विचार करण्याची सवय असेल तर त्याचे परिणाम त्याला आयुष्यभर भोगावे लागतात. कारण अशा माणसांच्या आयुष्यात चांगले, हितकारक कधीच घडत नाही. नकारात्मक विचार सरणीमुळे प्रयत्न करूनही त्यांच्या वाट्याला विपरित परिस्थिती येत राहते. सतत रडणारी, चिडचिड करणारी, दुःख करणारी माणसे आपण आजूबाजूला पाहत असतो.नकारात्मक विचार करणारी माणसे सहज नैराश्य, डिप्रेशन, मानसिक आजार यांना बळी पडतात. अशी माणसे घरी किंवा समाजामध्ये नकोशी होतात. यासाठी घरात लहानपणापासूनच मुलांना चांगले आणि सकारात्मक विचार कसे मिळतील याची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे.

सकारात्मक विचार करणारी माणसं संकटातून मार्ग काढतात , संकटाकडे तसेच परिस्थिती कडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यवस्तीत असला तर संकटे सुद्धा संधी च्या स्वरूपात दिसतात. एखाद्या विशिष्ट परिस्थिती माणसाला गोंधळात टाकते, पण शांतपणे आणि सकारात्मक दृष्टीने पाहिले असता त्याच परिस्थितीत माणसाला काही तरी नवीन शिकायला मिळते आणि यावर मात करून संधीही मिळते.

शरीराची आणि मनाची काळजी घेण्यासाठी नियमित व्यायाम आणि सकारात्मक विचार, दृष्टिकोन असावा . जर तुम्हाला सतत नकारात्मक विचार करण्याची सवय असेल तर तुम्हाला प्रयत्नपूर्वक सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात करण्यासाठी खास प्रयत्न करावे लागतील . ताण-तणाव आणि आजूबाजूचे नकारात्मक वातावरण यामुळे जर तुमच्या मनात गोंधळ निर्माण झाला असेल, तर मन शांत आणि निवांत राहण्यासाठी प्राणायम आणि मेडीटेशन जरूर करा. कारण तुमचे मन शांत झाल्यामुळे तुम्हाला सकारात्मक विचार करण्याचे आणखी बळ मिळेल. मेडिटेशन केल्याने आपल्या शरीरातील सात चक्र कार्यान्वित होतात तसेच शरीर , मन निरोगी आणि आनंदी रहाण्यासाठी मदत होते.

प्रत्येक परिस्थिती मध्ये आपला दृष्टीकोन कसा असायला हवा ते एका उदाहरणावरून पाहूया, एका ग्लास मध्ये थोडस पाणी आहे यावरून आपण काय समजू शकतो, एक दृष्टिकोन असा की ग्लास अर्धाच भरलेला आहे तर दुसरा दृष्टिकोन म्हणजे पाणी थोडसच आहे पण इतकं पाणी तहानलेल्या साठी पुरेस आहे. तसेच कोणाचा जीव वाचण्यासाठी एवढही पाणी पुरेस आहे.

धकाधकीचे जीवन आणि सतत वाढणारी चिंता-काळजी ही सर्वाच्याच वाट्याला येत असते. मात्र कामाचा ताण तेवढ्यापुरताच घेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही ऑफिस अथवा कामाच्या ठिकाणी असता तेव्हा घरची चिंता, काळजी न करता कामावर लक्ष नियंत्रित करा. ज्यामुळे तुम्हाला कामाचे टेंशन येणार नाही. प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम केल्यामुळे काम वेळेत पूर्ण होईल आणि घरी गेल्यावर तुम्हाला कामाचे टेंशन येणार नाही. त्याचप्रमाणे घरी असताना कामाचा विचार न करता कुंटुबासोबत मजेत वेळ घालवा. घरी पुरेसा वेळ दिल्यामुळे कामाच्या ठिकाणी तुम्हाला घरातील चिंता सतावणार नाहीत. दोन्ही ठिकाणी समतोल साधता येईल.

घरचे काम, ऑफिसचे काम, झोप, जेवण, व्यायाम, वाचन, चिंतन, आरोग्य, कुटुंबाला पुरेसा वेळ देणं या सर्वच गोष्टी माणसाच्या जीवनात फार महत्वाच्या आहेत. यासाठी या सर्व कामांचे योग्य नियोजन करा. नियोजन केल्यामुळे तुम्हा प्रत्येक कामाला योग्य न्याय देऊ शकाल. सतत नवनवीन ज्ञान आत्मसात करा जीवन हे अनेक चांगल्या-चांगल्या गोष्टींनी भरलेले आहे. जगात अनेक सकारात्मक गोष्टी घडत असतात. मात्र माणसे स्वभावानुसार नकारात्मक गोष्टी, गॉसिप यामध्ये जीवनातील बराचसा वेळ वाया घालवतात. जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर चांगल्या आणि सकारात्मक गोष्टींचे ज्ञान मिळवा. या ज्ञानामुळे तुमचे जीवन आनंदी आणि प्रफुल्लित होईल.

प्राणायम आणि ध्यानधारणा यामुळे तुमचे मन हळूहळू शांत आणि निवांत होऊ लागेल. मात्र प्राणायम आणि मेडीटेशन योग्य व्यक्तीकडून शिकून घ्यायला हवे. चुकीच्या पद्धतीने प्राणायम अथवा मेटीटेशन केल्यास त्याचे विपरित परिणाम तुमच्या शरीर आणि मनावर होऊ शकतात. तज्ञांकडून मेडीटेशन शिकणे शक्य नसल्यास सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना काही मिनीटे प्रार्थना अथवा शांत संगीत ऐकण्यासाठी द्या. ज्यामुळे तुमचे मन शांत होईल. मन शांत झाल्यामुळे तुम्हाला गाढ झोप लागेल आणि सकाळी उठल्यावर फ्रेश वाटेल. जेव्हा तुमची सकाळ फ्रेश होते तेव्हा सकारात्मक विचार करण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळते.

थोडक्यात आपला मन हे आपल्या शरीररुपी कॉम्पुटर चे सॉफ्टवेअर आहे जे आपल्याला वेळोवेळी अपग्रेड करणे गरजेचे आहे .जसे आपण आपल्या मोबाइलचे सॉफ्टवेअर अपग्रडे करतो अगदी तसे .

माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणे. त्यासाठी मनोनिग्रह करा आणि आपला जीवनातील आनंद आपणच शोधा. जग सुंदर आहे परंतु त्याला नकारात्मकतेने दुःखे करू नका एवढेच सांगणे.

प्रा. गायत्री श्रोत्रीय
सहायक प्राध्यापक ,
रसायनशास्त्र विभाग ,
मॉडर्न कॉलेज ,गणेशखिंड ,पुणे
Mobile: 8390718496

Most Popular

To Top