माझा जिल्हा

संस्कार शाळेच्या दिंडी महोत्सवातील विठू नामाच्या गजराने दूमदूमली परळी..

परळी ( प्रतिनिधी) – शहरातील संस्कार प्राथमिक शाळा विद्यानगर विभागाची संस्कार दिंडी मोठ्या उत्साहात शहरातून काढण्यात आली. संस्कार प्राथमिक शाळेची संस्कार दिंडी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या दिंडीने परळीकरांचे लक्ष वेधून घेतले. दिंडीतील विठ्ठल नामाचा गजराने सर्व परळी दूमदूमली होती. तसेच दिंडीत घोडे, झेंडे, पालकी ,भजनी मंडळ,देखावा इत्यादी गोष्टी होत्या. हा संस्कार दिंडी महोत्सव पद्मावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. कैलासजी तांदळे व सचिव दीपकजी तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.यावर्षीच्या संस्कार दिंडी महोत्सवाची थीम ‘ प्रवास अध्यात्माचा, शोध अंतर्मनाचा …!’ अशी होती.या थीमच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी दिंडी मध्ये उत्साह भरला होता. या दिंडीमुळे परळीत साक्षात पंढरपूर अवतरल्याचा अनुभव परळीकरांना व परिसरातील नागरिकांना पाहायला मिळाला.

पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव दीपकजी तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्कार शाळेतील शिक्षकांच्या माध्यमातून न भुतो न भविष्यती असा भव्यदिव्य संस्कार दिंडी महोत्सव पार पडला. डोळ्याचं पारणं फिटेल अशी भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल दिंडी सोहळ्यात पहायला मिळाली. यावर्षी अध्यात्माच्या प्रवासातून अंतर्मनाचा शोध घेण्याचा संदेश या दिंडीतून देण्यात आला.

वारकरी वेशभूषा केलेले विद्यार्थी, हातामध्ये टाळ, मृदंग, विद्यार्थ्यांचे नृत्य आणि भक्ती गीतांच्या नादात भक्तिमय वातावरण तयार झाले होते. विठ्ठल व रुक्माई यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी पाहून विठ्ठल-रुक्माई चे दर्शन घेण्यासाठी शहरातील भाविक गर्दी करत होते.

संस्कार प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा ‘ संस्कार दिंडी महोत्सव ‘ पाहण्याची पर्वणी परळीकरांनी डोळ्यात साठवून ठेवली. संस्कार शाळेच्या या दिंडी महोत्सवाचे तसेच विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने दिंडी महोत्सवात उपस्थित होते. संस्कार दिंडी महोत्सव यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

Most Popular

To Top