मोपलवारांच्या लाचखोर संभाषणाचा संबंध ‘समृद्धी’शी आढळल्यास पदावरुन हटवणार
मुंबई, दि. 2 :- मुख्यमंत्र्यांच्या महत्वकांक्षी ‘समृद्धी’ महामार्ग प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार हे कोट्यवधी रुपयांच्या लाच देवाणघेवाणीबाबत बोलत असल्याचे ऑडीओ संभाषण विधान परिषदेत सादर करत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. धनंजय मुंडे यांनी श्री. मोपलवार यांना पदावरुन हटवण्याची जोरदार मागणी केली.
श्री. मुंडे यांच्या मागणीला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री. मोपलवार यांच्या संभाषणाचा ‘समृद्धी’शी संबंध असल्यास त्यांना पदावरुन हटवण्यात येईल, अशी घोषणा केली.
समृद्धी महामार्गाचे प्रमुख अधिकारी, राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार हे जमिनींचे बेकायदा वाटप व कोट्यवधी रुपयांची लाच स्विकारण्याबाबत दूरध्वनीवरुन मध्यस्थाशी चर्चा करीत असल्याची ऑडीओ क्लिप कालपासून माध्यमांमध्ये फिरत आहे. त्या क्लिपची दखल घेऊन श्री. मुंडे यांनी नियम 289 अन्वये तो मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता. यावेळी त्यांनी ऑडीओ क्लिपची सीडी तसेच मुद्रीत संभाषणही सभागृहात सादर केले.
श्री. मुंडे यांनी यासंदर्भात सांगितले की, समृद्धी महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष असून इतका गंभीर, संवेदनशील विषय श्री. मोपलवार यांच्यासारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याकडे का सोपवण्यात आला आहे ? समृद्धीचे प्रमुख अधिकारी म्हणून मुख्यमंत्र्यांचे श्री. मोपलवार यांच्याशी नियमीत संभाषण होत असल्याने ध्ननीफितीतील श्री. मोपलवारांचा आवाज ओळखणे मुख्यमंत्र्यांना सहजशक्य आहे. मोपलवारांनी मंत्रालयातही कोट्यवधी रुपये द्यावे लागतील, असा उल्लेख केला आहे. हे पैसे कुणाला द्यावे लागतात, असा प्रश्नही मुंडे यांनी विचारला.
श्री. मोपलवारांच्या संभाषणातील ‘कल्पतरु’ व ‘लोढा’ या व्यक्ती कोण आहेत ? मुख्यमंत्री गेली अडीच वर्षे केवळ भ्रष्टाचाऱ्यांची चौकशी करण्याची करण्याचेच आश्वासन देत आहेत, परंतु भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई होत नाही, हा अनुभव आहे. समृद्धीसारख्या महत्वपूर्ण प्रकल्पावर श्री. मोपलवार यांच्यासारखा भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप असणारा अधिकारी असणे योग्य नाही, त्यामुळे त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा किंवा त्यांना पदावरुन हटवण्यात यावे. श्री. धनंजय मुंडे व अन्य सदस्यांच्या संतप्त, आग्रही भूमिकेनंतर, श्री. मोपलवारांच्या संभाषणाचा समृद्धीशी संबंध असल्यास त्यांना पदावरुन दूर करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत केली.