मंत्री प्रकाश महेता व मोपलवारांवर कारवाई होईपर्यंत विधान परिषदेचे कामकाज चालू देणार नाही
मुंबई, दि. 3 :- राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता व ‘समृद्धी’ महामार्ग प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या भ्रष्टाचाराचे नवनवीन पुरावे समोर येत असून त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी या दोघांना संरक्षण न देता मंत्री महेता यांना पदावरुन हटवावे तसेच श्री. मोपलवार यांना निलंबित करावे, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज दिला.
श्री. मुंडे यांच्या इशाऱ्यानंतर विरोधी पक्ष अधिक आक्रमक झाल्याने सभापतींनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. तत्पूर्वी, विधान परिषदेचे कामकाज सुरु होताच श्री. मुंडे यांनी मंत्री श्री. महेता व श्री. मोपलवार यांच्या भ्रष्टाचाराचे नवीन पुरावे सभागृहात सादर केले. ज्या व्यक्तीने श्री. मोपलवारांविरुद्ध तक्रार केली त्या व्यक्तीला धमक्या येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
श्री. मुंडे पुढे म्हणाले की, मंत्री श्री. महेता यांच्या भ्रष्टाचाराबद्दल काल सभागृहात बोललो तर सत्ताधारी सदस्य सभागृहातून निघून गेले. हे चालणार नाही. पारदर्शकतेच्या मुद्यावर निवडून आलेल्या सरकारला श्री. महेतांवरील आरोपांचे उत्तर द्यावेच लागेल असे सांगून श्री. मुंडे यांनी श्री. महेतांना पदावरुन हटवण्याची व श्री. मोपलवार यांना निलंबित करण्याची मागणी केली. त्यावर श्री. मोपलवार यांना सध्याच्या पदावरुन हटविण्यात येत असल्याची घोषणा’ मुख्यमंत्र्यांनी केली. त्याने समाधान न झाल्याने विरोधी पक्ष आक्रमक झाला व त्यातच दिवसभराचे कामकाज स्थगित करण्यात आले.