धनंजय मुंडे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर कडाडले
चर्चा काय करता , आरक्षण द्या – सरकारला सुनावले
मुंबई : – मराठा आरक्षणावर नुसती चर्चा आता आम्हाला करायची नाही, आम्हाला आता आरक्षण पाहिजे,
असे सांगत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आज विधानपरिषदेत सरकारवर कडाडले. शिवसंग्रामचे नेते व आमदार विनायक मेटे यांनी सभागृहाचे कामकाज सुरू होताच मराठा आरक्षणावर चर्चा व्हावी अशी मागणी केली असता त्यावर मुंडे यांनी सरकारला आणि मेटे यांनाही खडे बोल सुनावले.
आरक्षणावर चर्चा करण्याची मागणी काय करता, आता आम्हाला चर्चा नको, आम्हाला आता मराठा आरक्षण हवे आहे.
डिसेंबर 2014 पासून मराठा आरक्षणावर अनेकदा चर्चा झाल्या आहेत. त्यामुळे उद्या राज्यातून लाखोंच्या संख्येने सहभागी होणारे मराठा हे आरक्षणाची सभागृहात चर्चा व्हावी म्हणून मराठा मोर्चात सहभागी होत नाहीत, तर त्यांना आता सरकारने मराठा आरक्षण जाहीर करावे, या मागणीसाठी येत आहेत.
त्यामुळे आता चर्चा नको असे सांगत मुंडे यांनी मेटे यांच्या मागणीवर जोरदार आक्षेप घेतले.
आम्हाला आता मराठा आरक्षणावर कोणतीही चर्चा करायच्या नाहीत, तर सरकारने आरक्षण जाहीर केले पाहिजे. आरक्षण देत नसाल तर तुम्ही सत्तेत असून चर्चा कसली मागता, असा सवालही मुंडे यांनी विनायक मेटे यांना केला, त्यादरम्यान,
सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हा विषय कोणत्या आयुधांवर विचारला जात आहे, असा सवाल करत प्रश्नोत्तरे पुकारले. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. त्यामुळे सभापतींनी 20 मिनिटांसाठी सभागृहाचे तहकूब केले.
