मुख्य बातम्या

बीडमधे सरकार विरोधात ऐतिहासिक विराट मोर्चा

बीडमधे सरकार विरोधात ऐतिहासिक विराट मोर्चा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून निघालेल्या मोर्चात ऊसाचे वाढे लावलेल्या बैलगाडीतून नेते मंडळी जिल्हाधिकारी कार्यालयात आली. यावेळी धनंजय मुंडे यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणावर कडाडून टीका करत चांगलीच टोलेबाजी केली. 

बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 2014 मधले भाषण लोक विसरलेले नाहीत. सबका साथ सबका विकास, अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्ता मिळवली. पण, विकास
येरवड्याच्या रुग्णालयात आणि जय अमित शहायालाच अच्छे दिन आल्याचा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला. यावेळी पंकजा मुंडे यांच्यावरही त्यांनी टिका केली. यावेळी प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित यांनीही सरकार विरोधात टोलेबाजी केली.

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरील मागण्यांसाठी सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने बीडमध्ये मोर्चा काढला. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चात माजी मंत्री प्रकाश सोळंके, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार उषा दराडे, पृथ्वीराज साठे, सय्यद सलिम, राजेंद्र जगताप, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर आदी नेते सहभागी झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून निघालेल्या मोर्चात ऊसाचे वाढे लावलेल्या बैलगाडीतून नेते मंडळी जिल्हाधिकारी कार्यालयात आली. यावेळी धनंजय मुंडे यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणावर कडाडून टीका करत चांगलीच टोलेबाजी केली.

“बहोत हो गयी महागाईकी मार; आबकी बार….’ अशा घोषणा देत सत्ता मिळवली. पण “आता घ्या पेट्रोल 80, डिझेल 70 तर सिलेंडर 400 वरुन 800 वर गेला ‘ महागाईवरुन लक्ष विचलित करण्यासाठी नरेंद्र मोदी “मित्रो, शौचालय बांधो ‘ म्हणत आहेत असा टोलाही मुंडे यांनी मारला. अडचणींचा विषय आला की हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच नाव वापरत असल्याचा आरोपही त्यांनी केला. अद्याप एकही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. दैवताचे नाव घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे ते म्हणाले.

पंकजा मुंडेंवरही टीका 
यावेळी धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री आणि त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांच्यावरही टिका केली. गडावर बोलण्यासाठी 20 मिनीट मागतात. मग ऊसतोड मजुरांवर का बोलत नाहीत, एकही कोयता कमी झाला नाही असा टोला लगावला. अर्धा जिल्हा अंधारात आहे, जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची निम्मी पदे रिक्त आहेत. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने महामंडळ काढले पण, एकालाही मदत नाही, कार्यालय सापडत नाही, अधिकारी सापडत नाही असे सांगत त्यांना लाज वाटायला पाहिजे असेही धनंजय मुंडे म्हणाले.

सपनों का सौदागर : प्रकाश सोळंके 
आपल्या तारुण्यात “सपनों का सौदागर’ हा सिनेमा गाजला होता. हेमा मालिनीचा तो पहिला सिनेमा असल्याचे सांगत प्रकाश सोळंकेंनी नरेंद्र मोदींची या चित्रपटाशी तुलना केली. साडेतीन वर्षे झाले. 100 परदेश दौरे झाले, जनधन, नोटबंदी, यात माणसं मेली पण प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये येण्याचे काय झाले. निर्लज्ज आणि गेंड्याची कातडी पांघरलेले सरकार असल्याचा टोला त्यांनी लगावला.

सरकारचा हिशोब करुन हाकला : अमरसिंह पंडित 
शेतकरी प्रत्येक पाडव्याला सालकऱ्याचा हिशोब करतो. आता नुकताच पाडवा झाल्याने या सरकारचा हिशोब करुन त्याला हाकला असे अमरसिंह पंडित म्हणाले. कापूस 3200 रुपये, सोयाबीन 2000 हजार रुपये भावाने विकले जात आहे. विरोधी पक्षात व प्रदेशाध्यक्ष असताना हेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कापसाला साडेआठ हजार आणि सोयाबीनला साडेसात हजार रुपयांचा भाव देण्याची मागणी करत दिंड्या काढत होते. शिवसेनावाले लाल दिव्याच्या गाडीत बसून आंदोलन करतात. मर्द असाल तर बाहेर या. तुम्ही फक्त मुंबई बघा, बाहेर तुम्हाला कळायचं नाही असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगवला. “जो सरकार निकम्मी है, ओ सरकार बद्दलनी चाहीये” असेही अमरसिंह पंडित म्हणाले.

स्वपक्षीयांना कोपरखिळ्या 
सरकार विरोधी निघलेल्या मोर्चानंतर भाषणात नेत्यांनी सरकारच्या धोरणांवर टिका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केली. याच वेळी पक्षातील नेत्यांनाही कोपरखिळ्या मारल्या. धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे यांचा रोख पक्षाचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्यावर होता. धनंजय मुंडे यांनी “देशाचे नेते” अशी नाव न घेता त्यांना कोपरखळी मारली.

बीडमधे सरकार विरोधात ऐतिहासिक विराट मोर्चा
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top