महासत्ता :- काँग्रेस नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात झालेल्या सर्वात मोठ्या घोटाळ्याप्रकरणी माजी दुरसंचारमंत्री आणि डीएमकेचे नेते ए.राजा व डीएमकेच्या राज्यसभेतील सदस्य कनीमोझी यांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. 2G घोटाळ्यासंदर्भात पटियाळा हाऊस येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला.
काय आहे नेमके प्रकरण
संपुआ सरकारच्या काळात झालेल्या या स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्यात देशाच्या तिजोरीचे 1 लाख 76 हजार कोटीचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले होते. तत्कालीन विरोधी पक्ष भाजपाने यामुळे सरकारविरोधात केवळ संसदेतच नव्हे तर सर्व देशात सरकारविरोधात आंदोलने आणि विरोध प्रदर्शन केले होते. द्रमुक पक्षाचीही या महाघोटाळ्यामुळे मोठी नाचक्की झाली होती.
काय होते आरोप
ए. राजा यांनी स्पेक्ट्रम वाटपासंबंधी फेरफार केल्याचा ठपका संयुक्त संसदीय समितीच्या अहवालात ठेवण्यात आला होता. 2011 मध्ये या घोटाळ्याची दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरु झाली. या प्रकरणात न्यायालयाने ए राजा, कनिमोळी यांच्यासह 17 जणांवर आरोप निश्चित केले होते. गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे, सरकारी पदाचा गैरवापर करणे, लाच घेणे अशा विविध कलमांखाली त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले तीन प्रकरणे प्रलंबित
2G घोटाळ्याशी संबधित तीन प्रकरणे कोर्टात प्रलंबित आहेत. तिन्ही प्रकरणांवर निर्णय येण्याचे बाकी आहे. यामधील दोन याचिका सीबीआयने दाखल केल्या होत्या, तर एक अंमलबजावणी संचलनालयाने दाखल केली होती.
