भूगाव, 24 डिसेंबर: पुण्याचा अभिजीत कटके आज पुण्याजवळ भूगाव इथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत महाराष्ट्र केसरी ठरला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात अभिजीत कटके याने साताऱ्याच्या किरण भगत याचा 10-7ने पराभव केला.
यावर्षी महाराष्ट्र केसरी ठरलेला अभिजीत हा मागच्यावर्षी याचस्पर्धेचा उपविजेता ठरला होता. हा सामना पाहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. त्याला चांदीची गदाही देण्यात आली आहे.
अभिजीत कटके आणि किरण भगत या दोघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली. दोघंही एकामेकावर सरस ठरत होते. सामना संपायला 1 मिनीट22 सेकंद राहिले असताना स्कोअर 3-3 असा बरोबरीत निघाला होता. त्यानंतर कोण जिंकणार याची सगळ्यांनाच उत्कंठा लागली होती. अत्यंच रोमांचक अशा या सामन्यात किरण भगतने सरशी घेत 7 गुण मिळवले पण शेवटच्या काही क्षणात सारा डाव फिरवत 10-7 अशा गुणांनी अभिजीत कटके विजयी ठरला आहे.
एक वर्ष सातत्याने मेहनत करून चांदीची गदा मिळवणाऱ्या अभिजीतवर आता सगळीकडूनच शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.