पुणे – भारत आणि इंग्लंड यांच्यात पुण्यामध्ये झालेल्या पहिल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये टीम इंडियाने तीन गडी राखत विजय मिळवला. या सामन्यामध्ये कर्णधार विराट कोहली आणि पुणेकर केदार जाधव यांनी धमाकेदार खेळी करत इंग्लडने उभा केलेला धावांचा डोंगर सर केला. या सामन्यामध्ये मराठमोळ्या केदार जाधवला सामनावीर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मराठमोळ्या केदार जाधव याने ७६ चेंडूमध्ये १२ चौकार आणि चार षटकार मारत १२० धावा केल्या. केवळ ६५ चेंडूमध्ये केदार याने शतक झळकावले. केदारने केलेला हा कारनामा म्हणजे एक विक्रम ठरला असून एकदिवसीय क्रिकेटमध्ये जलदगतीने शतक ठोकणा-या भारतीयांच्या यादीत केदार पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.
केदार जाधव याच्याआधी एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने ५२ चेंडूमध्ये शतक झळकवले होते. त्यानंतर युवराज सिंह याने ६४ चेंडूमध्ये, वीरेंद्र सेहवाग याने ६० चेंडूमध्ये शतक झळकवले होते. तर ६१ चेंडूमध्ये पुन्हा एकदा विराट कोहलीनेच शतक झळकवले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये जलदगतीने शतक झळकावण्याचा विक्रम करणा-या भारतीय खेळाडूंच्या यादीत आता केदारचे नाव आले आहे.
यासोबतच केदार जाधवचे नाव आणखीन एका विक्रमामध्ये जोडले गेले आहे आणि ते म्हणजे भागीदारीमध्ये. इंग्लंडने दिलेल्या ३५१ रन्सचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाचे पहिले फलंदाज लवकर बाद झाले. यानंतर विराट कोहली आणि केदार जाधव यांनी टीम इंडियाला सावरले. दोघांनीही मिळून पाचव्या गड्यासाठी २०० धावांची भागीदारी केली. आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये पाचव्या गड्यासाठी झालेली द्विशतकीय भागीदारीची होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Mahasatta.com
