04 फेब्रुवारी : पार्टी विथ डिफरंस म्हणणाऱ्या भाजपाने तिकिट वाटपावेळी निष्ठावंताना डावलुन आयारामाना संधी दिल्याचा आरोप करण्यात आला.अनेक नाराज कार्यकर्त्यानी पक्ष पैसे घेऊन तिकिट वाटप करत असल्याचा आरोप केलाय. धक्कादायक बाब म्हणजे पक्षाच्या कार्यालयात बसुनच प्रत्येक उमेदवाराकडुन पदाधिकारी पैसे मागत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे .
नाशिक उमेदवारांकडून भाजपचे पदाधिकारी असलेले नाना शिलेदार आणि अरूण शेंदुर्णीकर हे दोघेही जण दीड ते दोन लाख रूपये मागत असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय. शेंदुर्णीकर तर पैसे चेकनेही चालतील असं म्हणतायत. पण हे पैसे निवडणूक खर्चाच भाग असल्याचं भाजपचं म्हणनं आहे पण ते कितीपत योग्य आहे? निवडणूक आयोगाला त्याची माहीती आहे का? असा खर्च पक्ष घेऊ शकतं का? फक्त नाशिकमध्येच भाजपनं असे पैसे घेतलेत की सगळ्याच पालिका निवडणुकीतील उमेदवारांना असे पैसे देणं बंधनकारक आहेत? असे अनेक सवाल नाशिकच्या प्रकरणानं निर्माण झालेत.
पालिका निवडणुकीतील प्रत्येक उमेदवाराला 8 लाख ही खर्च करण्याची मर्यादा दिली आहे. हा पैसा पक्ष निधी म्हणून मागितला जात असला तरी कोणत्याही राजकीय पक्षास 2 हजार वरील रक्कमही रोख घेता येत नाही. यामुळंच यात काय गौडबंगाल आहे हा प्रश्न उपस्थीत झालाय. सध्या तरी निवडणूक अधिकाऱ्यांकडे कोणतीही तक्रार दाखल झाली नसली तरी भाजपाला खुलासा करावा लागणार हे नक्की.
दरम्यान, नाशिकमध्ये उमेदवारांकडून घेतलेले पैसे हा निवडणूक खर्चाचा भाग असल्याचं स्पष्टीकरण नाशिकच्या भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी दिलं आहे. IBN लोकमतने ही बातमी दाखवल्यानंतर त्यांचं स्पष्टीकरण आलं आहे.
