९९ रुपये ‘प्राईम मेंबरशिप’ देणार वर्षभर कॉलिंगही मोफत
मुंबई: मोफत इंटरनेट सुविधा देऊन मोबाईल सुविधा बाजारपेठेत खळबळ उडविणाऱ्या रिलायन्स जिओने मार्चमध्ये ‘हॅप्पी न्यू इअर ऑफर’ संपल्यानंतरही वर्षभर मोफत डेटा आणि कॉलिंग सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी ही घोषणा केली. केवळ ९९ रुपये भरून प्राईम मेंबरशिप घेणाऱ्या ग्राहकांना ही सुविधा मिळू शकणार आहे. नव्या ग्राहकांना हि सुविधा मिळविण्यासाठी ३१ मार्चपर्यंत जिओ कनेक्शन घेणे आवश्यक आहे.
जिओचे नवे दर प्लॅन्स १ एप्रिलपासून अमलात येणार आहेत. अन्य कंपन्यांपेक्षा जिओचे दर ग्राहकांसाठी अधिक फायद्याचे असतील; असा दावा अंबानी यांनी केला. अन्य कंपन्यांच्या तुलनेत २० टक्के अधिक डेटा देईल; असे त्यांनी सांगितले.
मोबाईल डेटा वापरणाऱ्या नागरिकांच्या संख्येत भारत प्रथम क्रमांकावर आला आहे. मागच्या महिन्यात मोबाईल धारकांनी १०० कोटी जीबी डेटा वापरला आहे. जिओ येण्यापूर्वी या यादीत भारताचे स्थान १५० वे होते; असा दावाही अंबानी यांनी केला.जिओने प्रत्येक सेकंदाला ७ ग्राहक मिळविले असून ५० लाख जणांना रोजगार दिला आहे; असा दावाही त्यांनी केला. १० कोटी ग्राहकांचे लक्ष्य जिओने पूर्ण केले असून पुढील वर्षभरात देशातील ९९ टक्के गावा-खेड्यांपर्यंत पोहोचण्याचे आपले लक्ष्य असेल; असेही त्यांनी सांगितले.