औरंगाबाद– मराठा समाजाचा राजकीय पक्ष काढण्यासाठी आमदार हर्षवर्धन जाधवांनी औरंगाबादमध्ये चिंतन बैठक आयोजीत केली आहे. मराठा समाजासह मुस्लिम, धनगर आरक्षण व सामाजिक समतेसाठी स्वंतत्र राजकीय पक्षाची निर्मीती करण्याची संकल्पना कन्नड येथील शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मांडली होती. त्यामुळे ही बैठक बोलवण्यात आली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता. मात्र सरकारने कोणतीच ठोस पावली उचलली नाहीत, त्यामुळे मराठा आरक्षणासाठी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. आणि मराठ्यांचा स्वंतंत्र्य पक्ष काढावा, असं आवाहन केलं होतं.
मुख्यमंत्री व त्यांच्या सरकारवर आपला विश्वास राहिला नाही, त्यामुळे नवा राजकीय पक्ष स्थापन करावा का? याची चाचपणी उद्याच्या चिंतन बैठकीतून हर्षवर्धन जाधव घेणार आहेत. दुपारी 2 ते 6 या वेळेत तापडीया नाट्य मंदिरात ही चिंतन बैठक होणार आहे. मराठा समाजासह अठरा पगड जातीच्या लोकांनी या बैठकीत सहभागी होऊन स्वतंत्र राजकीय पक्षाबद्दलची मते मांडावीत असे आवाहन हर्षवर्धन जाधव यांनी केले आहे.
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने बैठक बोलवून मराठा क्रांती मोर्चाचा वापर कोणीही राजकीय पक्ष काढण्यासाठी करू नये, नाहीतर त्याला चांगला धडा शिकवू, असं बैठकीत सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आज होणाऱ्या चिंतन बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.