महाराष्ट्र

अन धनंजय मुंडेंना आपले पाहिले भाषण आठवले..

पिंपरी चिंचवड | महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात माजी नगरसेवक शेखर ओव्हळ त्यांच्या पहिल्याच भाषणात भावुक झाले आणि त्यांना रडू कोसळले हे दृश्य पाहताच व्यासपीठावर उपस्थित राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ओव्हळ यांच्या दिशेने पाऊले टाकत त्यांना धीर दिला. आणि आपण स्वतःला पण असा अनुभव आलाय असे उपस्थितांना आपल्या पहिल्या भाषणाचा अनुभव ऐकवला.

यावेळी मुंडे म्हणाले की, माजी नगर सेवक शेखर ओव्हाळ यांचे भाषण ऐकून त्यांचे पाहिल्यांदाच भाषण होते यावर विश्वास बसणार नाही. त्यांचे भाषण ऐकून मला माझे सुरुवातीचे भाषण आठवले. विद्यार्थी संघटनेचे काम करत असताना 1995 ला मराठवाडा कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून माझा सत्कार झाला होता. तेव्हा, माझे पहिले भाषण झाले. दहा मित्रांनी दहा भाषणे लिहून दिली ते वाचले. परंतु, जेव्हा व्यापीठावर गेलो, हातात माईक आला, अन तेव्हा दहाच्या दहाही भाषणे विसरून गेलो होतो आणि मग मनाचे बोललो. केवळ आठ मिनिटे बोललो पण पोटात आणि मनातून आलेले बोललो होतो. त्यावेळपासून लागलेली सवय ती 23 वर्षे झाली जात नाही, असेही मुंडे म्हणाले.

दरम्यान माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ हे धंनजय मुंडे यांच्या समोर पहिल्यांदाच भाषण करत होते. त्यामुळे त्यांच्या तोंडून शब्द न फुटता हुंदके आले. भावनिक होऊन त्यांना अश्रू अनावर झाले. हे पाहून व्यासपीठावर बसलेल्या धनंजय मुंडेंनी त्यांच्या दिशेने पावले टाकत त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच पाठीवर थाप देत भाषण करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

Most Popular

To Top