महाराष्ट्र

उद्योग क्षेत्रापुढील समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध : उद्योगमंत्री सुभाष देसाई

       

उद्योगमंत्र्यांचा उद्योजकांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद

मुंबई, दि. 9 : कोरोनामुळे उद्योग क्षेत्रापुढे अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्या सोडविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
 

संचारबंदीच्या काळात उद्योगांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी सीआयआय            (कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिज) च्या वतीने विविध उद्योग समूहांच्या प्रमुखांसोबत उद्योगमंत्री यांच्या व्हिडिओ कान्फरन्सचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री. देसाई बोलत होते.

श्री. देसाई म्हणाले, देशात संचारबंदी लागू झाल्यानंतर उद्योग क्षेत्रातील समस्या जाणून घेण्यासाठी उद्योग विभागाने तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. यामध्ये उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे तसेच एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांचा समावेश आहे. उद्योजकांच्या सूचना आणि समस्या सोडविण्यासाठी हा गट सतत कार्यरत आहे.

दरम्यान, कोरोना संकटानंतर उद्योग क्षेत्रापुढे मोठे आर्थिक संकट निर्माण होण्याची भीती आहे. त्यावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन मार्ग काढण्याची गरज आहे. याकामी राज्य शासन उद्योजकांसोबत असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.

सीआयआय (कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंटस्ट्रिज) च्या वतीने या चर्चासत्राचे आय़ोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे तसेच एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, सीआयआयचे महाराष्ट्राचे संचालक अरविंद गोयल,  गोदरेज, एल ॲन्ड टी, के.ई.सी. पॉलिकॅब, सॅमी हेवी इंडस्ट्रीज, जॉन्सन कंट्रोल, स्कोडा, फोक्सवॅगन व महिंद्रा आदी नामांकित कंपन्यांसह इतर कंपन्यांचे 170 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी विविध उद्योग समूहांच्या प्रमुखांनी संचारबंदीच्या काळात येणाऱ्या अडचणी विषद केल्या.
खरीप हंगामाच्या अनुषंगाने शेती अवजारे, कीटकनाशके, खते, कृषिपंप यांचा पुरवठा करण्याची परवानगी द्यावी.

संरक्षण दलास लागणाऱ्या साधनांच्या उत्पादनासाठी परवानगी द्यावी.

निर्यातीचे व्यवहार सुरू करण्यास परवानगी मिळावी.

आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची परवानगी द्यावी.

 या सर्व मागण्यांचा साकल्याने विचार करून त्यावर मार्ग काढण्याची ग्वाही श्री. देसाई यांनी दिली

000

अर्चना शंभरकर/वि.सं.अ./9/4/2020

Most Popular

To Top