*सत्ताधारी भाजपाच्या दबावामुळेच राणा डोईफोडेवर पोलिसांकडून सौम्य कारवाई- धनंजय मुंडेंचा आरोप*
_अधिवेशनात जाब विचारणार; राष्ट्रवादी विद्यार्थीनींच्या पाठीशी खंबीरपणे उभी_
मुंबई दि.30………………. स्वत: प्राचार्य असलेल्या विठाई नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थीनींचीच छेड काढणारा राणा डोईफोडे हा भाजपाचा पदाधिकारी असल्यामुळेच सत्ताधारी पक्षाच्या दबावापोटी पोलिसांनी त्याच्यावर सौम्य कारवाई केली असल्याचा आरोप विधानपरिषद विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी केला आहे. डोईफोडेला पाठीशी घालणाऱ्या आणि वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाविरूध्द कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली असून याप्रकरणी आपण आगामी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बीड मधील पिडीत विद्यार्थीनींच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस खंबीरपणे उभी असून त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
बीड येथील विठाई नर्सिंग महाविद्यालयाचा प्राचार्य आणि भाजपाचा पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य पती राणा डोईफोडे याने विद्यार्थीनींची केलेल्या छेडछाडीचे प्रकरणामुळे जिल्ह्यात सध्या संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर घटना उघडकीस येताच ना. धनंजय मुंडे यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना दुरध्वनी करून डोईफोडेवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती, असे असताना पोलिसांनी याप्रकरणी संशयास्पद भुमिका घेत आरोपीविरूध्द अजामीनपात्र गुन्ह्याची नोंद झालेली असतानाही प्रत्यक्षात आरोपीवर कारवाई मात्र 354 अ नुसार केल्यामुळे आरोपीला एका दिवसातच जामीन मिळवून दिला. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा संतापाची लाट निर्माण झाली आहे.
त्यापार्श्वभुमीवर प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे ना.धनंजय मुंडे यांनी डोईफोडे हा सत्ताधारी भाजपचा पदाधिकारी असल्यानेच त्याच्याविरूध्द सौम्य कारवाई केल्याचा आरोप केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची तसेच आरोपीला पाठीशी घालणाऱ्या पोलिसांविरूध्दही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली असून याप्रकरणी आपण आगामी अधिवेशनातही आवाज उठविणार असल्याचे सांगितले. जिल्ह्याच्या पालकमंत्री ह्या महिला बालकल्याण मंत्री असूनही त्यांच्या जिल्ह्यातील मुलींवर त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून अत्याचार होत आहेत आणि सत्तेचा वापर करून अशा आरोपींना वाचविण्याचे भूमिका घेतली जात आहे, ही अतिशय लाजीरवाणी बाब असल्याचेही ते म्हणाले.
—————————————–
