नगर :- पाथर्डी तालुक्यातील तिसगावजवळील मांडवे येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर काल (शुक्रवारी) अत्याचार करण्यात आला. त्यामुळे लोकांत संताप व्यक्त केला जात आहे. आज मांडवे येथे ग्रामसभा घेऊन गावकरयानी आरोपी अटक होईपर्यंत शांत न बसण्याचा निर्णय घेत प्रकाराचा निषेध केला. त्यानंतर तिसगाव येथील मुख्य चौकात दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.
मांडवे येथील विद्यर्थिनीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक करावी, अशी मांडवे आणि परिसरातील ग्रामस्थांनी मागणी केली. पाथर्डीत शाळकरी विद्यार्थ्यांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. आज तिसगाव, करंजीची बाजारपेठ बंद आहे. अत्याचार झालेल्या मुलीवर नगरला जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पाथर्डी तालुक्यासह जिल्हाभर या प्रकाराचा निषेध केला जात आहे. राज्यभर गाजलेल्या कोपर्डी घटनेनंतरही जिल्हात अत्याचाराचे प्रकार सुरूच असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांच्या कामावरही लोक नाराजी व्यक्त करत आहेत.
पीडित मुलगी मांडवे गावावरून तिसगावला शाळेत जात होती. त्यावेळी तिसगावात सोडण्याचा बहाणा करून दुचाकीवर बसवून अनोळखी दुचाकी स्वाराने रस्त्यावर एका ठिकाणी अत्याचार केला. पोलिसांनी आरोपीचे रेखाचित्र प्रसिद्ध केले आहे.