नाथरा ग्रामपंचायत पुन्हा ना.धनंजय मुंडेंच्या ताब्यात
सरपंचपदी राष्ट्रवादीच्या श्रीमती.कमलबाई मुंडे यांची बिनविरोध निवड
बीड वै.दि.27……………….
.संपुर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या परळी तालुक्यातील नाथरा ग्रामपंचायत पुन्हा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आली असुन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीमती.कमलबाई माणिकराव मुंडे यांची आज बिनविरोध निवड जाहिर करण्यात आली. त्यासोबतच राष्ट्रवादीचे पाच सदस्य ही बिनविरोध विजयी घोषीत करण्यात आले.
ना.धनंजय मुंडे यांचे जन्मगांव असलेल्या प्रतिष्ठेच्या नाथरा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले होते. 7 ऑक्टोबर रोजी होणार्या या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख होती. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या मुदतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार श्रीमती.कमलबाई माणिकराव मुंडे यांचाच एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्या बिनविरोध विजयी झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकार्यांनी जाहिर केले. 9 सदस्यांच्या निवडीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग 1 मधुन सुमनबाई विश्वनाथ मुंडे, सुमनबाई मधुकर मुंडे, प्रभाग 2 मधुन नागनाथ मारोती मुंडे, प्रभाग 3 मधुन नारायण संभाजी मिसाळ, सखुबाई शिवाजी किरवले हे पाच सदस्य बिनविरोध निवडुण आल्याचे निवडणुक निर्णय अधिकार्यांनी जाहिर केले. सरपंच पदासह 9 पैकी 5 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य बिनविरोध विजयी झाल्याने ही ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुन्हा ताब्यात आली आहे. इतर बिनविरोध आलेल्या चार सदस्यांमध्ये महादेव विश्वनाथ मुंडे, सुभाष सोमाजी मुंडे, भाग्यश्री जिवन मुंडे, ज्योती राहुल सुर्यवंशी यांचा समावेश आहे.
पाच वर्षापुर्वी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलचा दणदणीत विजय झाला होता. पाच वर्षात ग्रामपंचायती मार्फत गावात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केल्यामुळे यावर्षीची ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध पार पडली. विजयी उमेदवारांचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे, जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे यांनी अभिनंदन केले आहे. निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यानी आणि नाथ्रा ग्रामस्थांनी जल्लोष केला.
—————————————-
