06 फेब्रुवारी महासत्ता : भाजपच्या नेत्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या सभेला आजवर हजारोंच्या संख्येनं गर्दी केली. मात्र, आता ही गर्दी ओसरलीये. हिंगोलीत पंकजांच्या सभेसाठी ‘गर्दी’ जमवण्यासाठी चक्क शाळकरी मुलांना बोलवावं लागलं. एवढंच नाहीतर सभेला गर्दी होत नसल्यामुळे पंकजा मुंडे यांनी औंढा नागनाथ येथे दर्शनाला जावं लागलं.
हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची सभा औंढा तालुक्यातील साळणा आणि सेनगाव तालुक्यातील हत्ता येथे आयोजित करण्यात आली होती. मात्र पंकजा मुंढे या प्रचार सभेसाठी येत असतानाही गर्दी जमत जमत नसल्याने भाजपच्या स्थानिक नेते आणि उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली.
साळणा येथे आयोजित सभेसाठी वेळ होऊन सुद्धा गर्दी जमली नाही अखेर पंकजा मुंढे यांना वेळ घालवण्यासाठी औंढा नागनाथ येथे दर्शनासाठी जावे लागलं. इतकंच नाही तर सभेची जागा भरावी यासाठी भाजपचे उमेदवार आणि सभेचे आयोजक चक्क शाळेतील मुलींना सभेच्या ठिकाणी आणत होते. विशेष म्हणजे ८-९ वर्षाच्या मुली ज्यांना मतदानाचा अधिकार नाही आणि ज्यांना राजकारणाविषयी जास्त ज्ञान नाही अशा चिमुकल्यांच्या गळ्यात भाजपचे रुमाल टाकण्यात आले. एकीकडे भाजप पारदर्शकतेचा प्रचार करत आहे आणि दुसरीकडे आपल्याच पक्षात ‘अपारदर्शक’ कामाचा सपाटा लावण्याचं चित्र समोर आलंय.