वांगीची घटना गंभीर ; संपूर्ण शालेय पोषण आहार योजनेचीच चौकशी करा – धनंजय मुंडे
मुंबई दि 27 —-बीड जिल्ह्यातील वांगी येथे मिड डे मिल खाल्याने 93 मुलांना झालेली विषबाधेची घटना अतिशय गंभीर असून या संपूर्ण शालेय पोषण आहाराच्या योजनेचीच उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
वांगी येथील जिल्हा परिषदेत शाळेत शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत माध्यान भोजनातील मटकी खाल्ल्याने 93 बालकांना विषबाधा झाल्याची घटना आज दुपारी झाल्याने खळबळ उडाली असून शालेय पोषण आहारातील आहारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या बाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना धनंजय मुंडे म्हणाले की , सदर घटना अतिशय गंभीर असून या बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्रशासनाने प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. त्यांना चांगले उपचार करून त्यांना यातून लवकरात लवकर बाहेर काढून पालकांना दिलासा दिला पाहिजे.
शालेय पोषण आहार योजनेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करतांना मुंडे म्हणाले की, बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची ही योजना असतांना त्यात प्रचंड मोठा घोटाळा असल्यानेच अशा घटना वारंवार घडत आहेत. निकृष्ट दर्जाचा आणि कमी पुरवठा यातून ही योजना म्हणजे संपूर्ण भ्रष्टाचाराने पोखरली असून त्याची संपूर्ण उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे, याबाबत आपण आगामी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचेही मुंडे यांनी म्हटले आहे.