बीड (प्रतिनिधी) : निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र टोलमुक्त ने सोलापूर धुळे हा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होण्याआधीच ढीगभर टोलनाके तयार करून ते टोलनाके सुरू करण्याचा घाट संबंधित कंत्राटदाराने घातला आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण असतांना ज्या शेतकर्यांच्या महामार्गासाठी जमीनी गेल्या त्या शेतकर्यांना संपूर्ण मावेजा मिळालेला नसतांना इथल्या सत्ताधारी नेत्यांनी टोलनाका सुरु करण्याचा कार्यक्रम घेतला. हा कार्यक्रम सुरु असतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली दोन तास रास्ता रोको आंदोलन करत राष्ट्रीय महामार्ग आडवण्यात आला. शेतकर्यांचा मावेजा, आणि रस्त्यावरील सुविधा उपलब्ध करुन न देता टोला नाका सुरु कराल तर याद राखा, टोलनाका जाळून टाकूत असा गर्भीत इशारा राष्ट्रवादीचे युवक नेते संदीप क्षीरसागर यांनी दिला. बळजबरीने टोल उभारला तर उध्वस्त कसा करायचा हे आम्हाला माहित असल्याचा इशारा माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी दिला. तर बायपास प्रश्नी व शेतकर्यांच्या मावेजासाठी सरकार कानाडोळा करत असेल तर न्यायालयीन लढाई ही आम्ही लढूत असे प्रतिपादन माजी आ.सय्यद सलीम यांनी केले. राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रवादीचे वतीने शनिवार दि. 9 मार्च रोजी रास्ता रोको करत संताप व्यक्त करण्यात आला.
धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील लोकार्पण सोहळ्याचे आयोजन गेवराई शहरात करण्यात आले होते. पाडळसिंगी येथील टोलनाका सुरु करण्यात येणार होता. तिकडे गेवराईत हा कार्यक्रम सुरु असतांना बीडमध्ये मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने जबरदस्त रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकर्यांचा मावेजा तातडीने द्या, राष्ट्रीय महामार्गाला आवश्यक तेथे सर्व्हिस रोडची सुविधा द्या, बीडबायपासला सर्व्हिस रोड करा अशा विविध मागण्यासाठी रास्तो रोको आंदोलन करण्यात आले. सदर रस्त्याचे काम अपूर्ण असतांना इथल्या सत्ताधार्यांकडून आणि नेते मंडळींकडून उद्घाटनाचा घाट घातल्या गेला. याचा त्रास बीड जिल्ह्यातील जनतेला होणार आहे. टोलनाका सुरु केल्यामुळे जिल्ह्यातील जनतेच्या खिशाला कात्री लागेल असा जबरदस्तीने सुरु करण्यात आलेला टोलनाका कसा उध्दवस्त करायचा हे आम्हाला माहित आहे असा इशारा विजयसिंह पंडित यांनी दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्रशासनाने आंदोलनाच्या परवानगीपासून आपल्याला त्रास दिला, आपण शेतकर्यांच्या न्याय्य मागण्यासाठी लढत आहोत आणि हा लढा कायम चालू राहिल. यावेळी मनोगत व्यक्त करतांना ऍड. सुभाष राऊत म्हणाले की, पालकमंत्री यांची भूमिका दुटप्पी असून बीड बायपासला जो पर्यंत सर्व्हिस रोड दिल्या जात नाही तो पर्यंत टोल नाका सुरु करु नये अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. आमचं आंदोलन शांततेच्या मार्गाने असून या संदर्भात धनंजय मुंडे, शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे पाठपुरावा करत असतांना त्यांनी नितीन गडकरी यांना बीड बायपासला सर्व्हिस रोड करण्यात यावा मावेजाचे पैसे तातडीने देण्यात यावे या मागणीसाठी पत्र दिले परंतु प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही म्हणून हे आंदोलन करावं लागले. यापुढे आंदोलनाची तीव्रता वाढवून न्यायालयीन लढाई ही लढावी लागेल असे मत माजी आ. सय्यद सलीम यांनी व्यक्त केले. दरम्यान सदरील मागण्याचे निवेदन पोलिस उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनातील अधिकार्यांच्याकडे देण्यात आले.
संदीप क्षीरसागरांच्या आंदोलनाची धास्तीमुळे नितीन गडकरी, मुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा रद्द?
बीड बायपासला सर्व्हिस रोड करण्यात यावा, शेतकर्यांना पूर्णपणे मावेजाचे पैसे देण्यात यावेत या मागणीसाठी सुरु करण्यात येत असलेले आंदोलन होऊ नये यासाठी प्रशासनाकडून प्रचंड दबाव आणल्या गेला. त्यात याच रस्त्याच्या आणि टोलनाक्याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी बीड जिल्ह्यात येत असल्याने रस्ता रोकोच्या आंदोलनाला परवानगी तर मुळीच नाही अशी दुटप्पी भुमिका घेत पोलिस प्रशासनाने संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांना नजर कैदेत ठेवण्यापर्यंत प्रयत्न सुरु केले. संदीप क्षीरसागर यांचे प्रत्येक आंदोलन वेगळ्या शैलीत असते त्यांच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी असते, लोक जमा होतात असा रिपोर्ट पोलिस प्रशासनाने मंत्रालया पर्यंत पाठवलेला होता असे असतांना दोन्हीही मंत्री महोदयांचा दौरा रद्द झाला आणि त्यानंतर सोशल मिडीयामध्ये संदीप क्षीरसागर यांच्या आंदोलनाची धास्ती, नितीन गडकरी, मुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा रद्द! अशा पोस्ट फिरु लागल्या.
जेंव्हा बीड बायपास आणि महामार्गाचा सर्व्हे सुरु झाला तेंव्हापासून बीडचे स्वत:ला विकास पुरुष म्हणून मिरवणारे स्थानिक आमदार, रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे गेल्याचे फोटो बाहेर आले. नितीन गडकरी यांना हे विकास पुरुष नेमके कशासाठी भेटतात? हे जनतेने विचारल्यानंतर ते लोकांना बीड बायपास महामार्ग अशी कारणे सांगतात. परंतू जनतेला ते नेमकं कशासाठी भेटतात, बायपाससाठी की अन्य कशासाठी अशी कोपरखळी मारत टोल वसुल करणार्यांच्या व्यासपीठावर जाणार्या स्थानिक आमदारांनाच जनता धडा शिकवेल असा टोलाही संदीप क्षीरसागर यांनी लगावला आहे.
रुग्णवाहिकेला करुन दिली मोकळी वाट!
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी बीड बाय रोडवर रामनगरच्या जवळ चौकात विविध मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलनास बसले होते. आंदोलनास मोठ्या संख्येने लोकांची गर्दी जमा झालेली होती. वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. अशामध्ये एक रुग्णवाहिका आंदोलनास्थळाजवळ आली त्याच क्षणी संदीप क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांना सुचना करत रुग्णवाहिकेला मोकळी वाट करुन देण्याच्या सूचना दिल्या आणि रुग्णवाहिका औरंगाबादकडे मार्गस्थ झाली.