क्रिडा

नॉन-स्टॉप पंचवीस किलोमीटर सुसाट धावनारी मानवी आगगाडी.

नॉन-स्टॉप पंचवीस किलोमीटर सुसाट धावनारी मानवी आगगाडी.

        जळगाव : जिद्दीला पेटलेला तरुण काय करु शकतो, याचे जिवंत उदाहरण पिंपळवाड म्हाळसा , चाळीसगाव येथील नॉन-स्टॉप एकवीस किलोमीटर पळणाऱ्या 23 वर्षीय अनिल पाटील हा ठरला आहे. ध्येयाला पेटलेल्या अनिलचे ऑलिंपिक स्पर्धेतील मॅरेथॉनमध्ये भारताकडून खेळण्याचे स्वप्न आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून तो जात असल्याने त्याच्या पंखांना आर्थिक बळ मिळावे, अशी त्याची अपेक्षा आहे.
अनिल संजय पाटील याची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. यातही आकाशाला गवसणी घालण्याचे त्याचे स्वप्न आहे. त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी त्याची मेहनत थक्क करणारी ठरली आहे. लहानपणासून काही तरी वेगळे करण्याची जिद्द असल्याने एकदा सैन्य भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या मित्रांशी बोलत असताना त्याने पिंपळवाडपासून चाळीसगावपर्यंत धावत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार तो धावलाही. नंतर सैन्यात भरती होण्याची इच्छा मनात बाळगून बेजला ऍकडमीत त्याने प्रवेश घेतला. त्यात दररोज पंचवीस किलोमीटर पळावे लागायचे. त्यात त्याचा चांगला सराव झाला आणि त्याच्यात लांबवर पळण्याची सवय तिथेच रुजली. भरतीच्या निवड चाचणीत वैद्यकीय अडचणी आल्याने त्याने डोक्‍यातून सैन्य भरतीचा विचार काढून टाकला. गावाकडे आल्यानंतर तो धावू लागला. सध्या पंचवीस किलोमीटर कुठेही न थांबता “नॉन-स्टॉप’ पळतो. दररोज पिंपळवाड म्हाळसा ते बेलगंगा किंवा पिंपळवाड म्हाळसा ते दहिवाळ हे जवळपास 25 किलोमीटरचे अंतर तो एका तासात पार करतो. विशेष म्हणजे, सकाळ व संध्याकाळ तो धावतो. तीन तासांत बेचाळीस किलोमीटरही तो धावला आहे. त्याच्या या आत्मविश्वासामुळे परिसरातील तरुणांना जणू प्रेरणाच मिळत आहे. नवरात्रोत्सवात तुळजापूरहून देवीची ज्योत आणताना तो 71 किलोमीटर धावला होता. गावातील तरुणांना तो सैन्य भरतीत आवश्‍यक असलेल्या मैदानी चाचणीचेही तो धडे देतो. त्याच्या मार्गदर्शनामुळे गावातील तीन तरुण सैन्यात भरती झाले आहेत. बऱ्याचदा त्याला भरतींमध्ये मिळालेल्या अपयशामुळे त्याने खासगी कंपन्यांमध्ये काम केले आहे. मात्र, त्याला त्याचे धावपटूचे करिअर वारंवार खुणावत असल्याने कंपनींमध्येही त्याला फार काळ टिकून राहता आलेले नाही. पुन्हा त्याने गावाकडे येऊन आपला पंचवीस किलोमीटर पळण्याचा सराव सुरू केला आहे. सध्या स्टाफ सिलेक्‍शनच्या भरतीसाठी तो प्रयत्न करीत आहे. येत्या अकरा डिसेंबरला मुंबईत होणाऱ्या राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत अनिलने सहभाग घेतला आहे. ही मॅरेथॉन आपणच जिंकू असा त्याला आत्मविश्वास आहे.

पायाला दुखापत असूनही धावतो
सात वर्षांपूर्वी म्हणजे 2009 साली अनिलचा उजवा पाय मोडला होता. गुडघ्याच्या खाली पायाला दुखापत झाली होती. त्याचा पाय आता पूर्णपणे बरा आहे. या दुखापतीला न जुमानता, तो सध्या पंचवीस किलोमीटर धावण्याचा सराव करतो. त्याचा हा थक्क करणारा प्रवास ऐकून मनात उमेद निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.

भूतानला आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन
4 मार्च 2017 मध्ये भूतान येथे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत अनिलही सहभाग घेणार आहे. त्यासाठी त्याने नुकताच पासपोर्ट काढला आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 13 हजार रुपयांचे चलन त्याला भरावे लागणार आहे.

आर्थिक बळ मिळण्याची अपेक्षा
अनिलला आई- वडिलांसह दोन भाऊ आहेत. त्यांची स्वतःची एक बिघा शेती आहे. त्यात कसाबसा त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालतो. त्याचे स्वप्न आकाशाला गवसणी घालण्यासारखे मोठे आहे. त्यामुळे त्याच्या स्वप्नरुपी पंखांना आर्थिक बळ मिळाले तर माझे स्वप्न पूर्णही होईल, अशी अपेक्षा अनिलने व्यक्त केली.

नॉन-स्टॉप पंचवीस किलोमीटर सुसाट धावनारी मानवी आगगाडी.
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top