नवी दिल्ली : आज आपल्या भूमिकेवर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केलेले शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड हे ठाम राहिले असून मला दिल्ली पोलिसांनी अटक करू द्या, पण मी माफी मागणार नाही, अशा शब्दांत त्यांनी आव्हान दिले आहे.
गायकवाड प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, माफी मी मागणार नाही. ही माझी चूक नाही. ती त्याचीच चूक होती. माफी त्यानेच मागायला हवी. त्याला पहिल्यांदा माफी मागायला सांगा मग आम्ही विचार करू. मला दिल्ली पोलिसांनी अटक करू द्या. पुढे काय करायचे ते उद्धवजी ठरवतील. माझ्याकडे तिकिट आहे. ते मला ब्लॅकलिस्टमध्ये टाकू शकत नाहीत. आज संध्याकाळी मी दिल्लीहून पुण्याला जाणार आहे. ते मला परवानगी कशी नाकारू शकतात? असा प्रश्नही गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान गायकवाड यांना विमान प्रवास करू दिला जाणार नसल्याचा निर्णय हवाई वाहतूक संघटनांनी घेतल्याचे वृत्त आहे. दरम्यान, कोणत्याही प्रकारची हिंसा सहन केली जाणार नाही, असे म्हणत या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे. गायकवाड यांच्यासंदर्भातील प्रकरण संसदेच्या बाहेर घडल्यामुळे आम्ही या घटनेची खात्री करून घेऊ आणि नंतर त्याप्रमाणे कारवाई करू, अशी माहिती लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी दिली आहे.
गायकवाड हे गुरुवारी पुण्याहून दिल्लीला जात होते. त्यांचे बिझनेस क्लासचे तिकिट होते. मात्र त्यांना इकॉनॉमिक क्लासमध्ये बसण्यास सांगितले. यावरून त्यांची क्रू मेंबर सोबत वादावादी झाली. यानंतर गायकवाडयांनी कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केली