पारनेर : लोकपाल व लोकायुक्ताच्या नेमणुकीबाबत केंद्र सरकार वेळकाढूपणा करत आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भ्रष्टाचाराविरोधात फक्त भाषणबाजी करतात, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी यांच्यावर तोफ डागली. जनलोकपालच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा दिल्लीत रामलीला मैदानावर लढा उभारण्याचा इशारा त्यांनी बुधवारी दिला़
लोकपाल नेमण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयात अनेकांनी जनहित याचिका दाखल केल्या आहेत़ त्यावरील सुनावणीत देशाचे महाधिवक्ता मुकुंद रोहोतगी यांनी विरोधी पक्षनेतेपद केंद्रात नसल्याने लोकपालची नेमणूक करता येणार नसल्याचे म्हटले आहे़ या पार्श्वभूमीवर हजारेयांनी राळेगणसिध्दीत पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर जोरदार टीका केली़ २०११ मध्ये आंदोलन केल्यावर संसदेत चर्चा होऊन मनमोहन सिंग यांच्या सरकारने जनलोकपाल विधेयक मंजूर केले़ त्यानंतर मोदी सरकारला आपण तीन वर्षात सुमारे तीस ते चाळीस वेळा पत्रव्यवहार करून लोकपाल नेमणूक व कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयाने १८ आॅगस्ट २०१३ रोजी व मागील महिन्यात आपणाला पत्र पाठविले असून त्यात राज्य सरकारला लोकायुक्त नेमण्यास सांगितल्याचे म्हटले आहे