खडसेंची राजीनाम्याची धमकी; पक्षनेतृत्वाकडून महाजन यांची पाठराखण
जळगाव जिल्हा परिषदेच्या विषय सभापतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद चांगलाच उफाळून आला. खडसे यांनी पुढे केलेल्या उमेदवाराला महाजन यांनी विरोध केल्याने खडसे हट्टाला पेटले आणि त्यांनी संतापून आमदारकीच्या राजीनाम्याचीही धमकी दिली. पक्षनेतृत्वापर्यंत हा वाद गेल्यावर त्यांनी महाजन यांची पाठराखण केल्याने खडसे यांच्या उमेदवाराला माघार घ्यावी लागली. या प्रकरणामुळे आता जळगावमध्ये खडसे यांच्याऐवजी महाजन यांचाच शब्द भाजपमध्ये प्रमाण राहील, असे संकेत मिळत आहेत.
खडसे व महाजन यांच्यामध्ये जुना वाद आहे. जिल्हा परिषदेतील विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी संख्याबळ थोडे कमी असल्याने गिरीश महाजन यांनी शिवसेनेला बाजूला ठेवून काँग्रेसच्या सदस्यांची चाचपणी केली होती. अरुणा पाटील यांच्याशी सुरुवातीला चर्चा झाली, मात्र निर्णय झाला नाही. नंतर महाजन यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क करून काँग्रेसच्याच दिलीप पाटील यांना सभापतिपद देण्याचे ठरविले. त्यामुळे अरुणा पाटील यांनी खडसे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही बाब घातली. अरुणा पाटील यांना सभापतिपद देण्यासाठी खडसे यांनी शब्द दिला, तर महाजन यांनी दिलीप पाटील यांना पाठिंबा दिला होता. दोघेही इरेला पेटल्याने खडसे व महाजन यांच्यात शनिवारी वाद झाला. माझा शब्द मानला जाणार नसेल, तर राजीनाम्यासारखा टोकाचा निर्णयही घेण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशी धमकीही खडसे यांनी महाजन यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. खडसे यांनी समर्थकांना सूचना दिल्या आणि अरुणा पाटील यांनी उमेदवारी अर्जही भरला. महाजन यांनीही भाजपच्या व अन्य पक्षांच्या सदस्यांची जमवाजमव केली आणि त्यांचा उमेदवार निवडून आणण्याची तयारी केली.
या घडामोडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या कानावर घालण्यात आल्या. दानवे, चंद्रकांत पाटील व ज्येष्ठ नेत्यांची चर्चा झाली आणि त्यांनी महाजन यांच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे अखेर खडसे यांनी समर्थन दिलेल्या उमेदवार अरुणा पाटील यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली.