महाराष्ट्र

कांदा उत्पादक शेतकरी सरकारकडून वाऱ्यावर;मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे 8 महिने पाठवला नाही – मा.धनंजय मुंडे

*धनंजय मुंडेंच्या लक्षवेधीने सरकारची कोंडी  असमाधानकारक उत्तराने लक्षवेधी राखून ठेवली*

नागपूर, दि. 09……..कांद्याचे भाव सातत्याने कोसळून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले असताना,  शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडलं. स्वत: मदत करणे तर दूरच, परंतु साधा मदतीचा प्रस्ताव राज्य सरकार केंद्राकडे आठ महिन्यात पाठवू शकलं नाही, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्रालाही राज्य सरकारने केराची टोपली दाखवल्याचे पुरावे सादर करुन त्यांनी सरकारची कोंडी केली. असमाधानकारक उत्तरामुळे सभापतींनी ही लक्षवेधी सूचना राखून ठेवत असल्याचे जाहिर केले.

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मागील 8 महिन्यांपासुन झालेली भीषण स्थिती, दर कोसळल्‍यामुळे त्यांचे होणारे हाल, राज्य व केंद्र सरकारने मदत देण्यात केलेले दुर्लक्ष या बाबत आज विधान परिषदेत लक्षवेधी द्वारे श्री.मुंडे, जयवंत जाधव, हेमंत टकले, सतिष चव्हाण, अमरसिंह पंडीत आदी सदस्यांनी सरकारचे लक्ष वेधले.

बाजारातील कांद्याच्या किमती कमी झाल्याने बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत केंद्र व राज्य सरकारने प्रत्येकी 50 टक्के खर्च उचलून खरेदीची तयारी दाखविली होती, दुर्देवाने 7 महिन्यात या बाबतचा साधा प्रस्तावही केंद्राला पाठवला नसल्याचा आरोप ना.धनंजय मुंडे यांनी केला. केंद्र सरकारने 31 मे, 2016 ते नोव्हेंबर 2016 पर्यंत राज्य सरकारला प्रस्ताव पाठविण्याबाबत 12 स्मरणपत्रे पाठवुनही त्याची दखल घेतली नाही, केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांच्या पत्राचीही सरकारला दखल का घ्यावी वाटली नाही ? असा घणाघाती आरोप करत ही 12 ही पत्रे सभागृहात त्यांनी सादर केली.

पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना या बाबत समाधान कारक उत्तरे न देता आल्यामुळे पणन राज्यमंत्री सुभाष देशमुख यांनी हस्तक्षेप करुन उत्तरे देण्याचा प्रयत्न केला, मात्र वारंवार विचारणा करुनही मदतीबाबतचा प्रस्ताव केंव्हा पाठवला हे त्यांना सांगता आले नाही. ना.गडकरी यांच्या पत्राचीही दखल न घेतल्याचा मुद्दा उपस्थित होताच सभागृहातील भाजपाचे सदस्य अस्वस्थ झाले. त्यावेळी झालेल्या गोंधळात सभापती रामराजे निंबाळकर यांनी ही लक्षवेधी राखुन ठेवत असल्याचे जाहीर केले.

*कांद्याच्या माळा घालुन आंदोलन*

त्यानंतर सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालुन विधानभवन परिसरात सरकार विरोधी घोषणा दिल्या. या आंदोलनात श्री.मुंडे, काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, जयवंत जाधव, हेमंत टकले, सतिष चव्हाण, अमरसिंह पंडीत, भाई जगताप, सौ.विद्या चव्हाण, निरंजन डावखरे, नरेंद्र पाटील, रामराव वडकुते, प्रकाश गजभिये संजय दत्त, हुस्नबानु खलिफे आदी सदस्य सहभागी झाले होते.

कांदा उत्पादक शेतकरी सरकारकडून वाऱ्यावर;मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे 8 महिने पाठवला नाही – मा.धनंजय मुंडे
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top