महाराष्ट्र

रोजगार देणारे उद्योग तातडीने सुरू करा – नाना पटोले

कोरोनाच्या समुळ उच्चाटनासाठी युध्दस्तरावर काम करा

भंडारा : महासत्ता ऑनलाइन – दि, 4,  टाळेबंदीमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून नव्या अधिसूचनेनुसार टाळेबंदी शिथिल करून रोजगार देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील लहान मोठे उद्योग तातडीने सुरू करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्ह्यात कोणीही उपाशी राहणार नाही याची दक्षता घेत जिल्हयात धान्य पुरवठा योग्य पध्दतीने करण्यात यावा तसेच पोलीस पाटील व ग्राम पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनेबाबत आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. आमदार राजु कारेमोरे, जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीप चंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोदवड तसेच संबंधित विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

परराज्यातील व महाराष्ट्राच्या इतर जिल्हयातील नागरिक भंडारा जिल्ह्यात अडकून पडले आहेत. त्यांना त्यांच्या जिल्हयात तसेच राज्यात पाठविण्याची सोय शासनातर्फे करण्यात येत आहे. परंतु काही जिल्हयाच्या बाबतीत त्यांनी पाठविलेले व्यक्ती प्रवास करुन गेल्यानंतर पॉझिटिव्ह आढळले आहेत. अशा परिस्थितीत काळजी घेण्याची गरज असून प्रत्येक व्यक्तींची वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे. कोविड-19 चे लक्षणे नाहीत अशा आशयाचे प्रमाणपत्र देणे अनिवार्य आहे. कोरानाच्या उच्चाटनासाठी युध्दपातळीवर काम करा, असे निर्देश नाना पाटोले यांनी दिले.
कोरोना साथरोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून केंद्र शासनाने देशात लॉकडाऊन घोषित केले तसेच सर्व प्रवासी वाहतूक व्यवस्था बंद केली. यामुळे अनेक नागरिक आहे त्याच ठिकाणी अडकून पडले तसेच आपल्या जिल्ह्यातही इतर राज्यातील व जिल्ह्यातील कामगार, विद्यार्थी, पर्यटक अडकून पडले आहेत. त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी केलेल्या व्यवस्थेचा आढावा विधानसभा अध्यक्षांनी घेतला.
लाखांदूर तालुका चंद्रपूर जिल्हयातील ब्रम्हपूरी तालुक्यास लागून असल्यामुळे तेथील रुग्ण आरोग्य सेवेकरीता ब्रम्हपूरीला जातात. परंतु जातांना गडचिरोली जिल्हयातून चंद्रपूर जिल्हयात प्रवेश करावा लागतो. लॉकडाऊनमुळे तेथील रुग्णास असुविधा निर्माण होत आहे. याकडे जातीने लक्ष देवून रुग्णास असुविधा होणार नाही याबाबत काळजी घेण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्षांनी दिल्या.

कोविड 19 च्या तपासणीसाठी दररोज 3 हजार व्यक्तींची तपासणी करता येईल अशा प्रकारचे रुग्णालय नागपूर येथे लवकरच होणार आहे. त्यामुळे कोरोना समुळ उच्चाटनासाठी सदर रुग्णालय अतिशय उपयुक्त ठरणार आहे. वैद्यकीय तपासणी केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस जिल्हयाच्या बाहेर पाठवू नये. त्यासाठी आगावू मनुष्यबळाची व्यवस्था करा. त्यामुळे तपासणी करणे सुलभ होऊन यंत्रणेवर ताण येणार नाही. प्रवासात संपर्कामुळे कोरोनाबाधितांचे प्रमाणे वाढले आहे. सोशल डिस्टंन्सिंगचे भान ठेवा. बांधकामावरील मंजूरांच्या व्यवस्थेबाबत सर्व अधिकार कार्यकारी अभियंता बांधकाम यांना सोपवा असे ते म्हणाले. कोरोना युध्दात सहभागी योध्दयांचे विमा संरक्षण करा. आरोग्य विभाग बरोबर. पोलीस पाटिल व् कोतवाल तसेच ग्राम पातळी वर कार्य करणारे महसूल व इतर विभागातील योध्दांचे सुध्दा विमा उतरवा, असे त्यांनी सांगितले.
होमगार्ड मानधनाचा निधी लवकरच जिल्हयाला देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हास्तराप्रमाणे उपविभागीय स्तरावर कोविड रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी सांगितले. साकोली येथे 22 व्हेंटीलेटर व तुमसर येथे 60 व्हेंटीलेटरसह कोविड रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले.
00000

Most Popular

To Top