औरंगाबाद : गावागावात स्वच्छता अभियान राबवण्याचा सल्ला देणाऱ्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवेंच्या कंपनीनेच या अभियानाला हरताळ फासला आहे. पालवेंच्या रेडिको कंपनीतून केमिकलयुक्त दुषित पाणी सोडलं जात असल्याची तक्रार आहे.
औरंगाबादच्या शेंद्रा एमआयडीसीमध्ये अमित पालवेंचा रेडिको मद्यार्क निर्मितीचा कारखाना आहे. या कारखान्यातून कुंभेफळ गावात केमिकलयुक्त दुषित पाणी सोडलं जातं
औरंगाबादच्या शेंद्रा एमआयडीसीमध्ये अमित पालवेंचा रेडिको मद्यार्क निर्मितीचा कारखाना आहे. या कारखान्यातून कुंभेफळ गावात केमिकलयुक्त दुषित पाणी सोडलं जातं. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी आणि आजार पसरत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
इतकंच नाही तर गावातल्या विहिरी, बोअरवेल्स आणि हातपंपातूनही लाल पाणी येतं. परिणामी इथली शेती नापीक झाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे रेडिको मद्यार्क कंपनीतून निघणारं हे पाणी सुकना धरणात जातं. तिथून 10 ते 15 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो.
नागरिकांनी प्रदूषण महामंडळाकडे तक्रारी केल्या. पण पंकजा मुंडेंच्या पतीचा कारखाना असल्यानं कारवाई होत नसल्याचं ग्रामस्थांच म्हणणं आहे. रेडिको कंपनीनं मात्र ग्रामस्थांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते पावसाचं पाणी असल्याचं सांगून हात वर केले आहेत.
रेडिको कंपनी सुरुवातीपासूनच वादात अडकली आहे. 2015 मध्ये शेतात केमिकल टाकल्याचा आरोप कंपनीवर झाला. त्यामुळे पिकांची नासाडीही झाली. आता पुन्हा एकदा दुषित पाण्यामुळे लोकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. गावा-गावात स्वच्छतेचं अभियान राबविणाऱ्या पंकजा मुंडेंनी या कारखान्याकडे लक्ष द्यावं, इतकीच मागणी आहे.