मुंबई | भाजप विकृतीमुळे महाराष्ट्र धर्म बुडाला आहे ही विकृती उखडून फेका, असं आवाहन शिवसेनेनं केलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र सामनातून शिवसेनेनं भाजप आणि आमदार राम कदम यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे.
काळ मोठा कठीण आला आहे. राणी पद्मिनीने स्वतःचे चारित्र्य, प्रतिष्ठा व धर्मरक्षणासाठी हजारो रजपूत स्त्रीयांसह जोहार केला. अल्लाउद्दीन खिलजी व त्याच्या मोगली अत्याचाराविरुद्धचा हा जोहार आजही हिंदुस्थानातील नारीशक्तीस प्रेरणा देत आहे, पण आजच्या युगातही भाजपच्या खिलजी विरोधात जोहार पत्करण्याची वेळ महाराष्ट्रातील तमाम मायभगिनींवर आली आहे काय ?, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
तसंच, महाराष्ट्राच्या तरुण पिढीस कोणता विकृत संदेश भाजप देत आहे? हेच त्यांचे हिंदुत्व आणि हीच त्यांची संस्कृती आहे काय ? श्रीकृष्ण स्त्रीयांचा बंधू होता. त्याच नात्याने तो रक्षण करीत होता, पण श्रीकृष्ण जन्मदिनीच भाजप आमदाराने नवे लिहिले व त्यावर भाजपचा एकही तोंडाळ पुढारी बोलायला तयार नाही.
दरम्यान, पंतप्रधान मोदी हे तिहेरी तलाक प्रकरणात मुसलमान स्त्रीयांना न्याय द्यायला निघाले आहेत व इथे महाराष्ट्रात स्त्री वर्गात भाजपाच्या आमदारांमुळे भीती पसरली आहे, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
