मुंबई: मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेनं आपला उमेदवार निश्चित केला आहे. विश्वनाथ महाडेश्वर हे शिवसेनेकडून महापौर पदासाठी अर्ज भरणार आहेत. मातोश्रीवर झालेल्या नेत्यांच्या बैठकीत महाडेश्वर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळं आता महाडेश्वर हे शिवसेनेकडून महापौरपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत.
विश्वनाथ महाडेश्वर यांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द:
– विश्वनाथ महाडेश्वर हे आतापर्यंत महापालिकेत तिसऱ्यांदा निवडून गेले आहेत.
– पहिल्या टर्ममध्ये ते शिक्षण समितीचे चेअरमन होते. तर नंतर पाच वर्ष ते स्थायी समितीत होते. तर 2012 साली त्यांच्या पत्नी पूजा महाडेश्वर या निवडून आल्या होत्या.
– या निवडणुकीत महाडेश्वर यांनी वांद्रे पूर्व येथील वॉर्ड क्रमांक 87 मधून त्यांनी भाजपच्या महेश पारकर आणि काँग्रेसच्या धर्मेश व्यास यांचा पराभव केला.
– राजे संभाजी विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजचे ते प्राचार्यही होते.
दरम्यान,आज महापौरपदासाठी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यामुळं सर्वच पक्षांनी सत्तेच्या समीकरणांची जुळवाजुळव सुरु केली आहे. सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेकडून महापौरपदासाठी रणनीती आखली जात आहे. त्याचाच भाग म्हणून आज शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांची मातोश्रीवर तातडीची बैठक पार पडली.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी मनोहर जोशी, दिवाकर रावते, सुभाष देसाई, गजानन कीर्तिकर, एकनाथ शिंदे, रामदास कदम, संजय राऊत असे सगळेच महत्वाचे नेते उपस्थित होते.
