सांगली :मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या रुग्णालयात सुरू असलेले बेकायदा गर्भपाताचे रॅकेट रविवारी उघडकीस आले. एका गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या तपासात सांगली पोलिसांनी नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत म्हैसाळनजीकच्या ओढ्याकाठी पुरलेले तब्बल १९ स्त्री गर्भ जेसीबीच्या सहाय्याने खोदून काढले. बीएचएमसची पदवी असलेला हा डॉक्टर मूळचा शिरोळ तालुक्यातील कनवाडचा आहे. १० वर्षांपासून म्हैसाळमध्ये तो बेकायदेशीर गर्भपात करत असल्याचे समोर आले आहे. गुन्हा दाखल होताच तो पसार झाला आहे.
मिरज तालुक्यातील खंडेराजूरी माहेर आणि तासगाव तालुक्यातील मणेराजूरी सासर असलेल्या २६ वर्षीय विवाहितेच्या डॉ. खिद्रापूरे यांच्या हॉस्पीटलमध्ये गर्भपात केला जात असताना तिचा मृत्यू झाला. ही घटना २८ फेब्रुवारी रोजी घडली. त्या विवाहितेचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच डॉक्टरने तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगून तिला सांगलीच्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु या ठिकाणी पोहचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर हे प्रकरण दडपण्याच्या हेतूने महिलेचा पती प्रविण जमदाडे याने तिचा मृतदेह थेट मणेराजूरीला नेला. गावातील लोकांना महिलेला आकस्मिक मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र ग्रामस्थांनी त्या विवाहितेवर तत्काळ अंत्यसंस्कारास विरोध केला. महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी धाव घेवून अंत्यसंस्कार रोखून धरले. त्यानंतर त्या महिलेचा मृतदेह सांगलीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आणला. शवविच्छेदनानंतर तिचे आई-वडील येईपर्यंत तो मृतदेह हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आला होता. ३ मार्च रोजी महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी पतीच्या दारातच तिच्यावर अंत्यसंस्कार करून आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर त्या महिलेचे वडील सुनील जाधव यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात, जावई प्रविण जमदाडे आणि डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे या दोघांविरोधात फिर्याद दिली.
पोलिसांना तपासात म्हैसाळमध्ये ओढ्याकाठी गर्भ पुरल्याचे समोर आले. यावेळी जेसीबीच्या सहाय्याने ओढ्याकाठी खुदाई करण्यात आली. तेथे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये असलेल्या गर्भांपैकी काही सडलेले तर काही पिशव्यांमध्ये मांसाचे आणि हाडांचे तुकडे असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांना दिली. त्या हॉस्पिटलमध्ये गर्भपात केले जात असल्याचे ठोस पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत. डॉ. खिद्रापुरेने आतापर्यंत किती गर्भपात केले, याची चौकशी सुरू आहे.