ज्येष्ठ विचारवंताचे आणखी किती घ्याल बळी , डॉ. कृष्णा किरवले यांची अमानुषपने हत्या.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे माजी प्रमुख, आंबेडकरी तत्त्वज्ञान, चळवळ व दलित साहित्याचे भाष्यकार डॉ. कृष्णा रामभाऊ किरवले (वय 63) यांचा त्यांच्या राजेंद्रनगर, म्हाडा कॉलनी येथील घरात तिघांनी घुसून चाकूने भोसकून निर्घृृण खून केला. घरातील फर्निचरचे काम केल्यानंतर पैशाच्या वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करून पोलिसांनी प्रीतम गणपती पाटील (वय 30) या फर्निचर बनवणार्याला अटक केली आहे. डॉ. किरवले यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा देशभर जागर केला आहे. त्यामुळे त्यांच्या खुनाचे पडसाद कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात पडले. राज्यातून खेद व संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
याबाबत माहिती अशी, राजेंद्रनगर परिसरातील म्हाडा कॉलनीत डॉ. कृष्णा किरवले यांचे घर आहे. आज दुपारी तीन जण त्यांच्या घरी आले. त्यांनी किरवले यांना वरच्या मजल्यावर असलेल्या शयनकक्षात नेले. तेथे जोरदार वादावादी सुरू झाल्याने किरवले यांची पत्नी कल्पना या वरच्या मजल्यावर गेल्या. त्यांना पाहून तिघांनी पळ काढला. त्यावेळी डॉ. किरवले यांचा चाकूचे वार करून खून केल्याचे श्रीमती किरवले यांना दिसले. हा प्रकार उघडकीस आल्यावर खळबळ उडाली. जुना राजवाडा पोलीस घटनास्थळी पोहोचले.
डॉ. किरवले यांचा खून वैयक्तिक कारणातून झाला असून त्याला सामाजिक कारण नसावे, असे विधान पोलीस उपाधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केले. त्याला उत्तम कांबळे, शहाजी कांबळे यांनी आक्षेप घेत आधी तपास पूर्ण करा, मगच कारण स्पष्ट करा, अशी मागणी करत किरवले यांना धमक्या आल्याचे निदर्शनास आणून दिले. या कार्यकर्त्यांनी पोद्दार यांची कार अडवून धरली. अखेर विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे घटनास्थळी पाटील पोहचले. त्यांनी तपास पूर्ण करून खुनाचे कारण स्पष्ट करू, असे सांगितल्यावर तणाव निवळला.
डॉ. किरवले यांचा जन्म बीड जिल्ह्यातील सिरसाळा येथे 4 मे 1954 रोजी झाला होता. डॉ. किरवले यांनी औरंगाबाद येथील मिलिंद कॉलेजमधून शिक्षण घेतले होते. तेथेच त्यांच्यावर आंबेडकरी चळवळीचे संस्कार झाले. आंबेडकरी विचारांची ऊर्जा देणार्या डॉ. गंगाधर पानतावणे संपादित ‘अस्मितादर्श’ या वाङमयीन नियतकालिकातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली. पानतावणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 31 व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी किरवले यांची निवड झाली होती. मराठवाड्यात शिक्षण झालेल्या किरवले यांनी दलित शाहिरी या विषयवार पीएच.डी. केली होती.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली 21 विद्यार्थ्यांनी पीएच.डी. तर 23 विद्यार्थ्यांनी एम. फिल. केले आहे. किरवले यांची साहित्यसंपदा विपुल होती. आंबेडकरी शाहिरी-एक शोध, दलित चळवळ आणि साहित्य, समग्र लेखक बाबुराव बागुल, पाली-ग्रामीण साहित्य शब्दकोश आदी पुस्तकांचे लेखन त्यांनी केले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या इंग्रजी लेखनात वापरलेल्या शब्दांची डिक्शनरी डॉ. किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठात बनवण्यात आली होती. ते शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख होते. विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राचे ते संचालक होते. आंबेडकरी तत्त्वज्ञान, चळवळ व दलित साहित्याच्या भाष्यकारांमध्ये अग्रगण्य म्हणून त्यांना ओळखले जात होते. लेखनाच्या माध्यमातून त्यांनी आंबेडकरांचे कार्य आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले आहे. त्यांनी केलेल्या आंदोलनामुळेच विद्यापीठामध्ये आरक्षित पदभरतीही सुरू झाली. गेल्या वर्षी जून महिन्यात रिपाइंचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते डॉ. किरवले यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता.