मी पत्रकार

एक बलात्कार असाही ……

“” बलात्कार “” म्हणजे केवळ शारीरिक अत्याचार नव्हे तर त्याची अनेक घृणास्पद रूपे आहेत . या विषयावर लिहू की नको , मत मांडू की नको असा विचार करत असतानाच एक विचार मनाला टच करून गेला की या सगळ्याला कुठेतरी वाचा फुटणे गरजेचे आहे . शारीरिक अत्याचारांची रीतसर तक्रार करता येते पण अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या स्त्रिया आजही उघडपणे बोलू शकत नाही .


बस किंवा ट्रेन मधून प्रवास करत असताना काही पुरुष जागा असूनही निव्वळ त्रास देण्यासाठी जाणून बुजून धक्के देतात व स्त्रियांनी तक्रार केली तर तुम्ही महिला डब्यातून प्रवास करा असा सल्ला दिला जातो . काही पुरुष प्रवासी चांगले सुद्धा असतात पण तरीही जाणून बुजून स्पर्श करणारे , धक्के देणारे अनेक नराधम आहेत .
सकाळी लवकरची लोकल पकडली असता अनेक वेळा पाहण्यात येते की साधी मिशी सुद्धा धड न फुटलेली मुले केवळ सकाळी महिलांच्या डब्यात बिंधास्त चढतात व अश्लील चाळे करतात . बऱ्याचदा भीतीने यांची तक्रार केली जात नाही पण हा सुद्धा नजरेने होणारा बलात्कारच आहे .
बस मध्ये जागा असूनही बाजूच्या सीट वर बसलेला पुरुष जेव्हा खड्डे आहेत ही सबब सांगून मांडीला , खांद्याला जाणून बुजून जो घाणेरडा स्पर्श करतात तो सुद्धा एक बलात्कारच आहे .
एवढच नव्हे तर प्रेमात असताना जेव्हा केवळ प्रेमाच्या नावाखाली मुलीची इच्छा नसताना वासनेला जो वाव दिला जातो तोही बलात्कारच आहे .
इतकंच नव्हे तर आपल्या समाजात आई बहिणी वरून राजरोज प्रत्येक वयोगटातील लोक उघड उघड अश्लील शिव्या देतात . त्यात त्यांना काहीच वावग वाटत नसलं तरीही हाही एक बलात्कारच आहे .
मुलीनवर ऍसिड फेकणे , प्रेमाच्या नावाखाली त्यांचे अश्लील फोटो मागून ते सोशल मीडिया वर पसरवणे हाही एक बलात्कारच आहे .
घरगुती हिंसा आणि लग्नानंतर होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास जो नवऱ्याकडून दिला जातो त्याची दखल तर आपला समाज आणि न्यायव्यवस्था फार कमी घेते . “”नवरा आहे तो , त्याचा हक्कच आहे “” असे बुरसटलेले विचार आणि मानसिकता असलेल्या लोकांची आपल्याकडे काही कमी नाही .

हे सगळं जर रोखायचे असेल तर सखींनो दुसरं कोणी आपलं रक्षण करेल , आपल्यासाठी उभं राहिलं याची अपेक्षा ठेऊ नका . स्वतःचा स्वाभिमान नेहमी जागृत ठेवा .आपल्या आसपासच्या आशा शिव्या देणाऱ्या किंवा प्रवासात त्रास देणाऱ्या लोकांना तिथेच अद्दल घडवा .घर असो वा कामाचं ठिकाण कधीही अश्या प्रकारचा अन्याय सहन करू नका .
आपल्या मुलींनाही कराटे सारखे क्लासेस लावा . एकवेळ त्यांना घरकाम नाही आलं तरी चालेल पण त्यांना इतकं सक्षम बनवा की त्यांच्यावर हात टाकणाऱ्याचा हात तोडून त्या त्याच्या दुसऱ्या हातात उपटून देतील .
एकच गोष्ट कायम लक्षात ठेवा “””””””” !!!!! अशी कोणतीही गोष्ट जी एखाद्या स्त्रीला शारीरिक त्रास देते , तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवते व तीच मानसिक संतुलन बिघडवते ती प्रत्येक गोष्ट हा एक बलात्कारच आहे .
त्यामुळे हे सगळं रोखलं पाहिजेच .

लेख : तेजल सावंत 

Most Popular

To Top