म्हैसाळ येथील स्त्री भ्रूणहत्या प्रकरणाची उच्च न्यायालयाने गुरुवारी गंभीर दखल घेतली. एवढेच नव्हे, तर या प्रकारांना रोखण्यासाठी राज्य सरकार काहीच करत नसल्यानेच हे प्रकार सर्रासपणे घडत आहेत. सरकारला अशा घटनांचे गांभीर्यही नाही, हेही या घटनेतून दिसून येत असल्याची टीका करत न्यायालयाने सरकारला धारेवर धरले. तसेच हे प्रकरण उघडकीस आल्यावर संबंधित विभागाने काय कारवाई केली याची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने सार्वजनिक आरोग्य विभागाला दिले आहेत. शिवाय राज्यातील नर्सिग होमना अचानक भेटी देऊन ती कायदेशीर आहेत की नाहीत याची पाहणी करण्याचेही न्यायालयाने सरकारला बजावले आहे.
डॉक्टर, औषध विक्रेत्याला पाच दिवस पोलीस कोठडी
सांगली : म्हैसाळ गर्भपात प्रकरणी अटक करण्यात आलेल्या विजापूरच्या डॉक्टर आणि औषध विक्रेत्याला न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी गुरुवारी मंजूर केली. जिल्ह्यतील गर्भिलग चाचणी केंद्रांची झाडाझडती शुक्रवारपासून प्रशासनाकडून हाती घेण्यात आली असून यासाठी समिती कार्यान्वित करण्यात आली आहे. म्हैसाळचे बेकायदा गर्भपात केंद्र उघडकीस आल्यानंतर मुख्य संशयित डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी कर्नाटकातील विजापूरचे डॉ. रमेश देवगिरकर आणि माधवनगरचा औषध विक्रेता सुनील खेडेकर या दोघांना अटक करण्यात आली. या दोघांना आज मिरजेच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता दोघांनाही १३ मार्चअखेर पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.