महाराष्ट्र

गंगाखेड कारखान्याचा घोटाल्याची इडी आणि सीबीआयमार्फत चौकशी करा- ना.धनंजय मुंडे

गंगाखेड कारखान्याचा घोटाळा 650 कोटी रूपयांपेक्षा जास्त इडी आणि सीबीआयमार्फत चौकशी करा- ना.धनंजय मुंडे

मुंबई, दि. ७ ………………….. गंगाखेड, जि.परभणी येथील रत्नाकर गुट्टे यांच्या साखर कारखान्याने शेतकऱ्यांना बँकांच्या मदतीने केलेला फसवणुक केलेला घोटाळा 650 कोटी रूपयांपेक्षा जास्त रकमेचा असुन या संपुर्ण घोटाळ्याची ईडी आणि सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. विधान भवनात पत्रकारांशी संवाद साधताना श्री. मुंडे यांनी राज्यातील सध्याच्या घडामोडींवर परखड भाष्य केले.

परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड शुगर्स कारखान्याच्या अध्यक्ष व संचालकांनी  बनावट कागदपत्रे व बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करुन शेतकऱ्यांच्या नावे परस्पर काढलेले कर्ज हा ६५० कोटींहून अधिकचा घोटाळा असून या प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालय व सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही श्री. मुंडे यांनी केली. यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून मा. पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्र्यांनीही या प्रकरणाची गंभीर नोंद घ्यावी, अशी मागणी करणार असल्याचे श्री. मुंडे म्हणाले.

*कुलगुरू डॉ.देशमुख यांना पदावरून दूर करा*

मुंबई विद्यापीठ परीक्षाप्रक्रियेत उडालेला गोंधळ तसेच परीक्षांचे निकाल वेळेवर न लागल्याने झालेले विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्यपालांना आदेश द्यावे लागल्याची घटना ताजी असताना विद्यापीठाने 111 कोटींच्या ठेवी मुदतपूर्व काढण्यात आल्याची माहीती समोर आली आहे. यातून विद्यापीठाचा बेजबाबदार, नियोजनशून्य कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून याची जबाबदारी सर्वस्वी कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांची असल्याने राज्यपालांनी त्यांना तात्काळ पदावरुन दूर करावे, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांनी केली आहे.

*शेटे मृत्युप्रकरणी स्वाती साठे यांना निलंबित करा*

भायखळा कारागृहातील वार्डन कैदी मंजुळा शेट्ये यांच्यावर लैंगिक अत्याचार, मारहाण करुन मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तुरुंग अधिकारी-कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न खुद्द तुरुंग उपमहानिरिक्षक श्रीमती स्वाती साठे यांनी केल्याचे त्यांच्या व्हॉटस्‌अप्‌ मॅसेजवरुन स्पष्ट होत आहे. हत्येसारख्या गंभीर गुन्ह्याच्या तपासात अडथळे आणण्याचा व आरोपींना मदत करण्याचा त्यांचा हेतू मॅसेजमधून दिसून येतो. आरोपींना मदत करण्याची मानसिकता असलेली व्यक्ती वरिष्ठ तुरुंग अधिकारीपदी असणे योग्य नसल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांच्या हितसंबंधांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही श्री. मुंडे यांनी केली.

*विश्वास पाटील यांच्या कारकिर्दीतील निर्णयांची चौकशी करा*

झोपडपट्टी सुधार प्राधिकरणाचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी सेवेच्या शेवटच्या पाच दिवसात ४५० नस्त्या मंजूर केल्याचे प्रकरण संशयास्पद आहे. यात आर्थिक गैरव्यवहार झाला असण्याची शक्यता असल्याने त्यांनी शेवटच्या महिन्यात मंजूरी दिलेल्या सर्व प्रकरणांना स्थगीती द्यावी, या कालावधीतील त्यांच्या दूरध्वनी, आवकजावकच्या नोंदी, टपालवही ताब्यात घ्यावी, त्यांच्या कारकिर्दीतील सर्व व्यवहारांची  विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही श्री. मुंडे यांनी केली.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर जिल्हा बँकांसमोर ढोल बडवण्याच्या शिवसेनेच्या आंदोलनावरही श्री. मुंडे यांनी टीका केली. शिवसेना राज्य व केंद्र सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या अंमलबजावणीची जबाबदारी त्यांचीच आहे. ते त्यांचे घटनात्मक कर्तव्य आहे, असे असताना जिल्हा बँकांसमोर ढोल बडवण्याचे नाटक करण्याऐवजी त्यांनी शासन म्हणून आपले कर्तव्य पार पाडावे. सरकारमध्ये भाजपच्या मांडीला मांडी लावून बसायचे व बाहेर ढोल वाजवायचा हा दुटप्पीपणा असल्याचे सांगून ढोल बडवण्याऐवजी डोके बडवून घ्यावे, असा टोलाही श्री. मुंडे यांनी शिवसेनेला हाणला.

गंगाखेड कारखान्याचा घोटाल्याची इडी आणि सीबीआयमार्फत चौकशी करा- ना.धनंजय मुंडे
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top